सातारा तालुक्यातील सांबरवाडी गावाने योगग्राम म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून गावात घरोघरी नियमित योगा केला जातो. लॉकडाऊनमध्येही या उपक्रमात खंड न पडता ग्रामस्थ घरातच ऑनलाईन योगा करतात. सांबरवाडीत योगाची जनजागृती मोठ्या प्रमाणावर होण्यामागे महत्त्वाची मार्गदर्शक भूमिका बजावणारे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद पारटे हे गेल्या २१ वर्षांपासून ज्या गावात नोकरी केली त्या गावात योगाचा प्रचार, प्रसार करत आहेत.
भारताची योग शिक्षणाची परंपरा जुनी आहे. धकाधकीच्या जीवनात शारीरिक, मानसिक सदृढतेसाठी योगा, प्राणायाम, ध्यान महत्त्वपूर्ण आहे. प्रल्हाद जयसिंग पारटे हे २०१८पासून सांबरवाडी शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. पहिल्या वर्षी ग्रामस्थांना योगसाधनेचे महत्त्व पटवून देत नित्य पहाटे शाळेत त्यानंतर मैदान, गावातील मोठे अंगण, एकाच दिवशी दोन-तीन ठिकाणी मुले, पालक, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, महिलांना योगाचे धडे देण्यास सुरुवात केली. प्रथमतः पाचजणांच्या उपस्थितीत मार्गदर्शन करत सध्या घरोघरी नित्य योगा होऊन ऐंशी टक्के ग्रामस्थ योगशिक्षणाचे धडे गिरवतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्येही ऑनलाईन, माहिती-योगाच्या क्लीप पाहून नियमित योगा करून गावाने आदर्श निर्माण केला आहे.
एकवीस वर्षांपासून पारटे
आर्ट ऑफ लिव्हिंग, पतंजली योग, योगविद्याधाम, विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी येथून योग प्रशिक्षण, योगप्रचार, प्रसाराचे कार्य करत आहेत. विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक विकास, निरोगी जीवनासाठी पालक, ग्रामस्थांसाठी योग, प्राणायाम, ध्यानवर्ग सुरू केला. हॅप्पी लाईफ फाऊंडेशनची स्थापना केली. निसर्गोपचार, जलनेतीचे मार्गदर्शन, लॉकडाऊन काळात ऑनलाईन योगाचे मार्गदर्शन करणाऱ्या प्रल्हाद पारटे यांची अखिल भारतीय योगशिक्षक महासंघ सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
कोट
शरीर-मनाच्या सदृढतेसाठी योगा, प्राणायाम, ध्यान महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होऊन कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत झाल्यामुळे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत नगण्य आहे. तालुक्यात सोनगाव, कुस खुर्द, शहापूर, पेट्री आदी शाळेच्या गावात योगवर्ग सुरू केले.
- प्रल्हाद पारटे, मुख्याध्यापक
चौकट
योगामुळे सकारात्मक ऊर्जा, चांगले विचार मिळतात. कोरोनापूर्वी उन्हाळी-दिवाळी सुट्टीत विनामोबदला योगाचे वर्ग सुरू असायचे तसेच सध्या ऑनलाईन योगावर्ग आहे. योग प्रचारासाठी विवाह, बारसे कार्यक्रमात आत्तापर्यंत नवविवाहितांना शेकडो योगाची पुस्तके मोफत देऊन त्यांचे नि:स्वार्थ सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
फोटो २० सांबरवाडी
सांबरवाडी येथील प्रत्येक कुटुंबातील सदस्य दररोज सकाळी योगसाधना करतात. (छाया : सागर चव्हाण)
( छाया -सागर चव्हाण )