शिरवळ : शिरवळ, ता. खंडाळा येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या तत्कालीन सहायक शाखा अधिकाऱ्यावर ५ लाख २८ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शिरवळ पोलीस दूरक्षेत्रात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप प्रभाकर तारू (मूळ रा. नांदेड) असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिरवळ येथील पंढरपूर फाटा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे. या ठिकाणी दिलीप तारू हा २००८ पासून दि. ३ जानेवारी २०१५ पर्यंत सहायक शाखा अधिकारी म्हणून कार्यरत होता. यावेळी शासनाची विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची फी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठानाच्या नावाने असणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या खात्यामध्ये जमा होत होती. ही जमा झालेली शिष्यवृत्ती सहयोगी अधिष्ठातांच्या सहीने विद्यार्थ्यांना चेकद्वारे अदा करण्यात येत होती. २५ एप्रिल २०१४ रोजी धनादेशाद्वारे दोन लाख ४० हजार, जूनमध्ये ६५ हजार रुपये, जुलैमध्ये ३५ हजार, सप्टेंबरमध्ये ३५ हजार, नोव्हेंबरमध्ये ४५ हजार, डिसेंबरमध्ये ४३ हजार व ६५ हजार रुपये अशी ५ लाख २८ हजारांच्या धनादेशाद्वारे सहयोगी अधिष्ठाता यांची बनावट सही करून खात्यामध्ये परस्पररीत्या वर्ग केली आहे. (प्रतिनिधी)
पशुवैद्यकीय महाविद्यालयात सव्वापाच लाखांचा अपहार
By admin | Updated: January 23, 2015 00:39 IST