तरडगाव : लोणंद येथील अडीच दिवसांचा मुक्काम आटोपून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा शनिवार, दि. १८ रोजी दुपारी दीडला तरडगाव मुक्कामासाठी खंडाळा तालुक्यातून मार्गस्थ होणार आहे. वारीतील पहिले उभे रिंगण सायंकाळी चारला चांदोबाचा लिंब येथे पार पडणार आहे.श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात गुरुवारी आगमन झाले. त्यानंतर अडीच दिवसांसाठी लोणंदमध्ये वैष्णवांचा मेळा स्थिरावला आहे. पालखीचा जिल्ह्यातील तिसरा मुक्काम फलटण तालुक्यातील तरडगाव येथे शनिवारी आहे. वारकऱ्यांच्या स्वागताला तरडगाव ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. वीज, पाणी, आरोग्य, संरक्षण आदी मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी विविध विभागांकडून जय्यत तयारी केली आहे. पालखीतळ व मोकळ्या जागेच्या परिसराची स्वच्छता केली आहे. दिंड्या ज्या ठिकाणी मुक्काम करतात, अशा परिसरातील काटेरी झुडपांची विल्हेवाट लावून सपाटीकरण केले आहे. माउलींचा कट्टा सुसज्ज करून तळावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तेथे प्रकाशझोत सोडले आहेत. स्नानगृह, सार्वजनिक स्वच्छतागृह, फिरती स्वच्छतागृहे यांची दुरुस्ती करून तळाच्या परिसरात अतिरिक्त नळजोड दिले आहेत. डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी धुराची फवारणी केली आहे. रस्त्यातील खड्ड्यांवर मुरुम व खडी टाकून रस्ते दुरुस्त केले आहेत. वारकऱ्यांना आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी तीन आरोग्य पथके तयार केले असून, परिसरातील ८१ विहिरींमध्ये टीसीएलची पावडर टाकण्यात आली आहे. पाण्याचे टँकर भरण्यासाठी कुसूर येथे चार पॉइंट तयार केले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालखीतळावर बंदोबस्त तैनात केली आहे. (वार्ताहर)
माउलींच्या उभ्या रिंगणासाठी चांदोबाचा लिंब येथे लगबग
By admin | Updated: July 17, 2015 22:59 IST