लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असून पोलिसांनी सातारा शहरात तर चौकाचौकांत नाकाबंदी करून कारवाईस सुरुवात केली आहे. यामुळे अनेकजण आता अंतर्गत रस्त्यावरून वाहने घेऊन जाऊ लागले आहेत. परिणामी, अंतर्गत छोट्या असणाऱ्या रस्त्यावर वाहतूककोंडी होऊ लागली आहे. सातारा शहरात हे चित्र दिसून येत असून यामुळे इंधनही अधिक लागत आहे.
कोरोनाबाधित आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातही याची अंमलबजावणी सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाबींना बंदी घालण्यात आली आहे. तरीही, नागरिक विनाकारण बाहेर पडत असल्याचे चित्र सातारा शहरात आहे. त्यामुळे सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी शहरातील चौकाचौकांत बॅरिकेट्स लावून नाकाबंदी केली होती. संशयित वाहनधारकांना थांबवून चौकशी केली जात होती. कोठून आला, कोठे जाणार आहे, याची विचारणा करण्यात येत होती. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात होती. त्यामुळे अनेकजण अंतर्गत रस्त्याचा पर्याय निवडताना दिसून आले.
अंतर्गत रस्त्यावरून दुचाकी, रिक्षा, कारही जात होत्या. मात्र, अंतर्गत रस्ते अरुंद असल्याने वाहतूककोंडी निर्माण होत होती. त्यामुळे वाहन मागेपुढे करण्यावरून वादावादीचेही प्रसंग घडले. तसेच अंतर्गत रस्त्यावरून जाण्यामुळे वाहनांना इंधनही अधिक लागत आहे.
फोटो दिनांक १९सातारा वाहन फोटो... मेल सेंड केला...
फोटो ओळ : सातारा शहरात पोलिसांनी चौकाचौकांत नाकाबंदी केल्याने अंतर्गत रस्त्यावरून वाहने नेण्यात येत होती.
.........................................................................