कराड : सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत हे दोघेही महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. वेदांता प्रकल्पाचा विषय हा त्यावेळचा आहे. तो सर्वांना चांगला माहित आहे. सर्च रिपोर्ट मध्ये सुद्धा या प्रकल्पासाठी महाराष्ट्रालाच पसंती होती. पण राज्यातील सरकार गाफील राहिल्यानेच हा प्रकल्प गुजरातला गेला. त्यामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. अशी टीका राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कराड येथे पत्रकारांशी बोलताना केली.बाळासाहेब पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरातकडे मोठा ओढा आहे. त्यामुळेच हा प्रकल्प इतर कोणत्याही राज्यात न जाता गुजरातला गेला आहे. तुम्हाला दुसरा मोठा प्रकल्प देतो असे सांगून सध्या सरकारची बोळवण सुरू आहे.नव्या सरकारच्या कारभारावर बोलताना पाटील म्हणाले, सण, उत्सव हे साजरे झालेच पाहिजेत. पण त्याला किती वेळ द्यायचा हे ठरविले पाहिजे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या सरकारने अधिक वेळ दिला पाहिजे. आज लंपी सारख्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असताना अजून पालकमंत्र्यांच्या नियुक्या झालेल्या नाहीत. सरकारचा कारभार गतिमान करण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार आवश्यक आहे. पण त्याकडे कोणी गांभीर्याने पाहत नाही असेही ते म्हणाले.त्यांचा राग कोणावर आहे हे सर्वांना माहीतकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर, ४ वेळा मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रासाठी भरीव काही केले नाही. अशी टीका केली आहे. याबाबत छेडले असता बाळासाहेब पाटील म्हणाले, ते माजी मुख्यमंत्री आहेत; त्यांच्याविषयी मी काय बोलणार? पण त्यांचा शिवसेना, काँग्रेस व आता भाजप असा झालेला प्रवास पाहता त्यांचा राग कोणावर आहे हे सर्वांना माहीत असल्याचेही त्यांनी सांगितले.बाजार समितीला सरसकट शेतकरी मतदार परवडणार नाहीशेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका नजीकच्या काळात होऊ घातल्या आहेत. न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे सोसायटी संचालक व ग्रामपंचायत सदस्य हेच त्याचे मतदार असतील असे वाटते. पण या सरकारने जर सर्व शेतकऱ्यांना याचे मतदार करून निवडणुका घेण्याचा प्रयत्न केला तर ते बाजार समित्यांना आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही .असे मतही माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केले.माझी तयारी कायमच सुरू असते!कराड बाजार समितिच्या निवडणूकीसाठी तुमची सध्या काय तयारी सुरू आहे? याबाबत विचारले असता, निवडणुका आल्यावर मी त्याची तयारी करीत नाही. तर माझी कायमच तयारी सुरू असते असे सांगत बाळासाहेब पाटील यांनी बाजार समिती निवडणूक कधीही लागू द्या आपण सज्ज आहोत असेच संकेत दिले.
राज्य सरकार गाफील राहिल्यानेच 'वेदांता' गुजरातला!, माजी मंत्री बाळासाहेब पाटलांची टीका
By प्रमोद सुकरे | Updated: September 16, 2022 16:20 IST