सातारा : केवळ माहिती दिली नाही म्हणून प्रशासन भ्रष्टाचारात बरबटले आहे, असा आरोप करण्यापूर्वी नगरसेवक वसंत लेवे यांनी कोरोनाकाळातील केलेल्या खरेदीबाबत एक नगरसेवक-विश्वस्त या नात्याने माहिती घेणे गरजेचे होते. त्यांचे आरोप तथ्यहीन व बिनबुडाचे आहेत,’ असा घणाघात नगराध्यक्षा माधवी कदम यांनी केला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नगरपरिषदेच्या प्रशासनात मुख्याधिकारी यांच्यापासून सर्वांचा सहभाग असतो, प्रशासनाला दिशा देऊन, ते चालवणे हे पदाधिकाऱ्यांचे काम आहे. त्यामुळे प्रशासनावर केलेले आरोप नगरपरिषदेच्या संबंधित प्रत्येक व्यक्तीबाबत संशयाचे वातावरण निर्माण करणारे आहे. बेफाम आरोप करण्यात वसंत लेवे यांचा हातखंडा आहे. त्यांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना बेकायदेशीर किंवा चुकीचे असे काहीच वाटत नाही. मात्र, दुसऱ्या कोणत्याही कामात त्यांना सर्व काही चुकीचे आहे, असा भास होतो.
वॉर्डातदेखील त्यांनी अनेकांना अनेक कारणांवरून अडचणीत आणले आहे. ते फक्त संधीची वाट पाहत आहेत. म्हणूनच नगरसेवक लेवे यांनी पार्टीशी एकनिष्ठ राहून, पार्टी नियमांप्रमाणे आपले वर्तन ठेवावे. भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोप करण्यापूर्वी लेवे यांनी पुरावे सादर करून आरोप करावेत, असा इशारादेखील नगराध्यक्षा माधवी कदम यांनी दिला आहे.
(कोट)
मी पार्टीशी एकनिष्ठ होतो आणि आहे. केवळ प्रशासनातील चुकीच्या कामाला माझा विरोध आहे. जर माझे आरोप तथ्यहीन व बिनबुडाचे असते तर नगराध्यक्षांनी अजेंड्यावरील २७ क्रमांकाचा विषय का तहकूब केला. त्याचवेळी सभागृहात माझे आरोप का खोडून काढले नाहीत. चुकीच्या कामांचे सर्व पुरावे माझ्याजवळ असून, त्या आधारावरच मी बोलत आहे. हे पुरावे मी केव्हाही सादर करायला तयार आहे. नगराध्यक्षांनी दबावाला बळी पडून माझ्यावर आरोप करू नयेत.
- वसंत लेवे, नगरसेवक