फलटण : तालुक्यातील भवानी डोंगरावर वणवा पेटला असून, आगीत नैसर्गिक साधनसंपत्तीचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. वणवा कशामुळे लागला हे समजू शकलेले नाही.
फलटण तालुक्यातील दुधेबावी व गिरवी परिसरातील भवानी डोंगराला गेले दोन दिवस वणवा लागलेला आहे.
भवानी डोंगरावर लागलेल्या वणव्यात गवत व वनविभागाने लावलेली झाडे जाळून खाक झाली आहेत. वनविभागाने या परिसरात शेकडो झाडे लावलेली आहेत. आगीत मोठ्या झाडांचे नुकसान झालेले नाही, मात्र छोटी झाडे भस्मसात झाली आहेत. शेतकऱ्यांना जनावरांसाठी उपयुक्त असणारे डोंगरी गवत मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले आहे. शक्य होते त्या ठिकाणी आग आटोक्यात आणल्यामुळे बाजूचे क्षेत्र वाचलेले दिसते. दुधेबावी व गिरवी गावासह पंचक्रोशीतील अनेक मेंढपाळ भवानी डोंगरावर आपली मेंढरे चरायला कायम नेत असतात. आता डोंगरच जळाल्यामुळे काही दिवस त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.