लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : बावीस वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतीमध्ये प्रारंभी ग्रामपंचायत कारभार सुरू असायचा; पण गत साडेचार वर्षांपासून नगरपंचायत प्रशासनाचे कर्मचारी ‘आळीमिळी गूप चिळी’ करत आडगळीतच कारभार चालवत आहेत. सध्या कोरोनाची वाढती भीती लक्षात घेऊन नगरपंचायत कर्मचारी बदलीसाठी आग्रही असल्याचे वास्तव समोर येत आहे.
वडूज ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्याने अतिरिक्त कामकाज वाढल्याने कार्यालयीन कामकाजासाठी नवीन कर्मचारी नियुक्ती करण्यात आली. तसेच सतरा नगरसेवक, दोन स्वीकृत नगरसेवक आणि सुमारे पंधरा कर्मचारी यांच्यासह मुख्याधिकारी असे शासन नियुक्त अधिकारी व कर्मचारी कोंदट इमारतीतील अपुऱ्या जागेत दाटीवाटीने कारभार चालवत आहेत. यामध्ये महिला कर्मचारीसुध्दा असून, एका महिला कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी चक्क उपनगराध्यक्षांच्या केबीनमध्येच बसून कामकाज करावे लागत आहे. ज्यावेळी उपनगराध्यक्ष नगरपंचायतीमध्ये येतात त्यावेळी त्यांना कामकाज थांबवून इतरत्र स्थानापन्न व्हावे लागते. सध्या कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असतानादेखील पूर्ण काळजी घेऊनही येथील कर्मचाऱ्यांना बाधित व्हावे लागले. याला कारण ही तसेच आहे. नगरपंचायतीमध्ये वडूज शहरासह तालुक्यातील नागरिकांची ये-जा सुरू असते. त्यातच दाटीवाटीने खुर्ची-टेबल मांडलेल्या ठिकाणी सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाचपर्यंत कार्यरत राहावे लागत आहे. सोशल डिस्टन्सिंगचा उडालेला बोजवारा चक्क नगरपंचायत कार्यालयातच पाहावयास मिळत आहे; तर काही कारणास्तव एका कर्मचाऱ्याला बाहेर पडावयाचे असेल, तर कसरत करून बाहेर पडावे लागत आहे. हा तुरुंगवास आज संपेल, उद्या संपेल या एकाच आशेवर येथील कर्मचारी प्रामाणिक राहून कार्यरत होते. मात्र, नगरपंचायत इमारतीला पर्यायी भव्य इमारत मिळत असतानाही संबंधितांची टाळाटाळ लक्षात येताच काही कर्मचारी बदलीसाठी आग्रही असल्याचे वास्तव समोर आले आहे.
चौकट..
प्रशासनाने विशेष सभेचे आयोजन करावे...
सध्याची नगरपंचायत इमारत ही पूर्णतः कोंदट वातावरण असलेली असून, अपुऱ्या सुविधा आणि कमी जागेत जादा कर्मचाऱ्यांचे कामकाज संसर्गजन्य आजाराला आमंत्रण देत आहे. हा वनवास संपणार कधी, याकडे कर्मचाऱ्यांसह नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण नगरपंचायत पंचवार्षिक मुदत संपत आली, तरी इमारत हलविण्यासाठी कोणाचीच ठोस भूमिका होत नसल्याने नागरिकांसह कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. नगरपंचायत कारभार स्थलांतरित करण्यासाठी यापूर्वीच ठरावही संमत करून घेण्यात आला आहे. नगरपंचायत जुनी तहसील इमारत नाममात्र भाडेतत्त्वावर मिळत असतानाही स्थलांतर टाळाटाळ नेमके कोण व कशासाठी करत आहे, हे वास्तव समोर येण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने एका विशेष सभेचे आयोजन करावे, अशी आर्त मागणीही जाणकार नागरिकांतून व्यक्त होत आहे.
०१वडूज
फोटो: वडूज येथील नगरपंचायतीत अपुऱ्या जागेत दाटीवाटीने नगरपंचायत कर्मचारी कामकाज करत आहेत.