मलवडी : माण-खटाव मतदारसंघातील जनतेला लागलेला दुष्काळीचा कलंक पुसण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सहकार्याने उरमोडीचे पाणी माणच्या अंगणी येत आहे. हे पाणी रविवार, दि. २४ रोजी खटाव तालुक्यातून किरकसाल बोगद्यातून येणार आहे. तालुक्यातील जनता या सुवर्णक्षणाकडे लक्ष ठेवून आहे.वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या खटाव-माणच्या जनतेला आमदार जयकुमार गोरे यांनी स्वप्न दाखविले होते. माण-खटावच्या मातीतून बारामती, सांगलीसारखा पाण्याने भरलेला कालवा पाहायचा आहे. येथील शेती हिरवीगार झाल्याची पाहायची आहे. येथील शेतकरी त्यांच्याच शेतात राबला पाहिजे. महिलांची पाण्यासाठीची वणवण थांबली पाहिजे, माणदेशी तरुणांना तेथेच रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, यासाठी आमदार जयकुमार गोेरे यांनी पाच वर्षे पाठपुरावा केला होता. या काळात उरमोडीच्या योजनेसाठी अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. याला यशही मिळाले आहे. दोन वर्षांपूर्वी दुष्काळाचा सामना करताना टंचाई काळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून उरमोडीचे पाणी खटाव तालुक्यातील येरळवाडी धरणात आणले होते. त्या पाण्याचे पूजन करताना आमदार जयकुमार गोरे यांनी हेच पाणी माण तालुक्यात नेण्यासाठी लागणारा निधी द्या, असा आग्रह धरला होता.त्यानुसार निधी मंजूर होताच आमदार गोरे यांनी या कामाचा रात्रंदिवस पाठपुरावा केला. मुंबई, कऱ्हाड येथे अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन कामाचा आढावा घेतला. या योजनेच्या कामात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत: जातीने लक्ष घातले होते. त्यामुळे या कालव्याचे काम दर्जेदार झाले आहे.आमदार गोरे यांच्या प्रयत्नांना यश आले असून, तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण होण्याचा क्षण आला आहे. उरमोडीचे पाणी रविवार, दि. २४ रोजी किरकसाल बोगद्यातून येत आहे. अनेक वर्षांनंतर येणाऱ्या पाण्याचे स्वागत करण्यासाठी माण व खटाव तालुक्यातील जनता सज्ज झाली आहे. ज्या गावांमधून उरमोडीचा कालवा गेला आहे. त्या गावांमधील ग्रामस्थांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. उरमोडी योजनेच्या कालव्याच्या कामाची आमदार जयकुमार गोरे यांनी पाहणी केली. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे दुष्काळग्रस्तांचे लक्ष रविवारच्या कार्यक्रमाकडे लागले आहे. (प्रतिनिधी)
उरमोडी येणार हो ‘माण’च्या अंगणी!
By admin | Updated: August 22, 2014 22:07 IST