प्रमोद सुकरे - कऱ्हाड -राजकारणात सध्या निष्कलंक माणसांची संख्या दुर्मिळ झाली आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर काँग्रेसमुक्त देश, काँग्रेसमुक्त महाराष्ट्राची घोषणा देत भ्रष्टाचाऱ्यांचा डांगोरा पिटला होता़ राज्याच्या निवडणुकीत मोदींचा ‘करिश्मा’ चालणार, अशी लोकसभा निवडणुकीनंतर अटकळ बांधली जात होती़ आज राज्याच्या काँग्रेसची पिछेहट दिसत असली तरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड दक्षिणचा काँग्रेसचा बालेकिल्ला मोठ्या फरकाने कायम ठेवला़ याचे श्रेय कार्यकर्त्यांसह त्यांच्या निष्कलंक व्यक्तिमत्त्वालाही द्यावेच लागेल़ कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला़ आमदार विलासराव पाटील-उंडाळकरांनी येथे विजयाची सप्तपदी पूर्ण केलेली; पण यंदा तब्बल १५ वर्षांनंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला़ पण, मोदी लाटेत काँग्रेसच्याच अतुल भोसलेंनी कमळ हातात घेतले, तर ३५ वर्षे काँग्रेसच्या झेंड्याखाली आमदारकी मिळविणाऱ्या विलासराव पाटील-उंडाळकरांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला़ स्वकीयांच्याच विरोधामुळे कऱ्हाड दक्षिणची निवडणूक ‘हॉट अॅन्ड हिट’ बनली होती़पृथ्वीराज चव्हाणांसमोर स्वकीयांचेच मोठे आव्हान होते़ मतदारसंघात त्यांनी केलेला विषारी प्रचार, उमेदवारांकडून दिली जाणारी आर्थिक प्रलोभने, यामुळे दक्षिणेत काय होणार याची साऱ्यांनाच उत्सुकता होती़ मात्र, प्रचाराचा धुरळा खाली बसल्यावर सुज्ञ मतदारांनी निवडणूक ‘हाता’त घेतली अन् विलासकाकांना नव्हे, तर पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विकासकामांना पसंती दिली़ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ‘होमपीच’वरच घेरण्यासाठी स्वकीयांबरोबरच, मित्रपक्ष अन् विरोधकांनी ‘फिल्डिंग’ लावली होती़ विलासराव पाटील-उंडाळकरांनी तर विंग येथील जाहीर सभेत काँग्रेसमधील काही नेत्यांनीच चव्हाणांना पाडा, असा मला फोन केल्याची जाहीर कबुली दिली होती; पण ती नावे गुपित ठेवली होती़ भाजपच्या विनोद तावडेंनी तर दक्षिणेत भाजपचे ‘कमळ’ फुलविण्याचा विडा उचलला होता़ तर एकेकाळी मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीनेही अगोदर राजेंद्र यादवांना अधिकृत दिलेली उमेदवारी मागे घेत उंडाळकरांना पाठिंबा देण्याची खेळी केली़ त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांचे काय होणार, याकडे राज्याचेच नव्हे, तर देशाचे लक्ष लागले होते़ काँगे्रसची उमेदवारी पृथ्वीराज चव्हाण यांना मिळाल्यानंतर विलासराव पाटील-उंडाळकर यांनी येथून बंडखोरी केली. मागील निवडणुकीमध्ये कऱ्हाड उत्तरमधून नशीब आजमावणाऱ्या डॉ. अतुल भोसले यांनी भाजपच्या लाटेवर स्वार होऊन पुन्हा एकदा शिंग फुंकले होते. राज्याच्या दृष्टिने कऱ्हाडच्या राजकारणाला आधीच नको इतके महत्त्व प्राप्त झाले होते. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. विलासराव पाटील-उंडाळकरांच्या अभेद्य मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाण यांचा निभाव लागणार का?, हाच प्रश्न अनेकजण बोलून दाखवित होते. कऱ्हाडचे सुपुत्र दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनाही अशा अग्निदिव्यातून जावे लागले होते़ तशीच वेळ या दुसऱ्या चव्हाणांवर आणली जातेय, हे कऱ्हाडकरांनी जाणले अन् एका सुसंस्कृत नेतृत्वाचा अस्त होऊ नये म्हणून नेत्यांचे आदेश धुडकावत पृथ्वीराज यांचे ‘हात’ बळकट करण्याचा निर्णय घेतला़ विलासराव पाटील-उंडाळकरांकडून पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यावर जनाधार नसल्याची टीका केली. तर डॉ़ अतुल भोसलेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाच्या अनेक तोफा कऱ्हाडात धडाडल्या. त्यांनी चव्हाणांवर व्यक्तिगत टीका केली़ त्याला टाळ्या मिळाल्या खऱ्या; पण त्या टीका कऱ्हाडकरांच्या पचनी न पडल्याने मते मात्र मिळालेली दिसत नाहीत़ जनतेनं सर्वांचंच ऐकलं मात्र आपल्या मताचं माप पृथ्वीराज चव्हाण यांच्या पारड्यात टाकलं. खरी लढत चव्हाण, उंडाळकर व भोसले यांच्यातच होती. या अटीतटीच्या लढतीत मोठी चुरस निर्माण झाली होती. निकाल जाहीर झाला. चव्हाणांचा विजय झाला. एकूण पृथ्वीराज चव्हाणांच्या मताधिक्यानेच टीकाकारांना त्याचे उत्तर मिळाले, असे म्हणावे लागेल़ सिंह आला; पण गड गेलाविलासराव पाटील-उंडाळकरांचा मुलगा एका खून खटल्यात तुरुंगात अडकला होता़ न्यायालयीन लढाई लढत असताना त्याचा कोणताही परिणाम स्वत:वर होऊ न देता त्यांनी कऱ्हाड दक्षिणची लढाईही लढली. मतमोजणीच्या आदल्या दिवशी मुलगा उदय‘सिंह’ पाटील निर्दोष झाला; पण दक्षिणच्या लढाईत ते पराभूत झाले़ त्यामुळे ‘सिंह आला; पण गड गेला’ अशी उंडाळकर गटाची अवस्था झाली आहे़ भरवशाच्या म्हशीला टोणगा येळगाव-उंडाळे, काले अन् कोळे हे तीन जिल्हा परिषद गट विलासराव पाटील-उंडाळकरांचे बालेकिल्ले़ प्रत्येक विधानसभा निवडणुकीत या जिल्हा परिषद गटांनी उंंडाळकरांना मोठे मताधिक्य दिले़ यंदाच्या निवडणुकीतही या तीन गटांवर त्यांचा भरवसा होता; पण निवडणूक निकालानंतर मतांची आकडेवारी बाहेर आली अन् ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ अशी स्थिती झाली़शहरी मतदारांचा चव्हाणांना ‘हात’कऱ्हाड, मलकापूर, सैदापूर व शहरालगतच्या उपनगरांनी पृथ्वीराज चव्हाणांना चांगलाच ‘हात’ दिला़ कऱ्हाडात अंदाजे सात हजार, मलकापुरात अंदाजे दोन हजार, सैदापुरात अंदाजे १५ हजार मताधिक्य मिळाले़ शहरी मतदारांनी मोठे मताधिक्क्य दिले. ही बाब मतमोजणी केंद्रावर असणाऱ्या समर्थकांच्या लक्षात आली़ ही बाब बाहेर कार्यकर्त्यांना समजली अन् त्यांनी मतमाजणी केंद्रापासून काढता पाय घेतला़ जिंकल्याचे कारणमावळत्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्रीपद. विधानसभा निवडणुकीआधी विकासकामे खेचून आणण्यात यश. विरोधकांची टीका पडली चव्हाणांच्याच पथ्यावर
निष्कलंक सच्च्या माणसाला कऱ्हाडकरांची साथ
By admin | Updated: October 20, 2014 22:31 IST