रहिमतपूर : रहिमतपूर नगरपरिषदेतील विविध समित्यांच्या सभापती निवडी बिनविरोध पार पडल्या. पाणीपुरवठा सभापतिपदी विद्याधर बाजारे, सार्वजनिक बांधकाम सभापतिपदी ज्योत्स्ना माने, महिला व बालकल्याण सभापतिपदी सुजाता राऊत व उपसभापतिपदी पद्मा घोलप यांची निवड पीठासन अधिकारी ज्योती पाटील यांनी मंगळवारी जाहीर केली.
कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर पालिकेच्या सभागृहामध्ये स्थायी समितीच्या सभापती निवडीची बैठक नगराध्यक्ष आनंदा कोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्षा सुरेखा माने, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, विरोधी पक्षनेते नीलेश माने, नगरसेवक अनिल गायकवाड, रमेश माने, शशिकांत भोसले, चांदभाई आतार, आदी नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
पीठासन अधिकारी ज्योती पाटील यांनी पालिकेतील विविध स्थायी समित्यांच्या सभापतींची निवडणूक प्रक्रिया राबविली. पाणीपुरवठा समिती सभापती, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एक-एकच अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यामुळे ज्योती पाटील यांनी बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहीर केले.
चाैकट :
चार वर्षांत एकच बैठक घेतल्याने नाराजी
निवडीदरम्यान बोलताना नीलेश माने यांनी समितीच्या विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी बैठका होत नसल्याने नाराजी व्यक्त केली. गेल्या चार वर्षांत समितीच्या सभापती निवडीव्यतिरिक्त एखादीच बैठक झाली आहे. ही पद्धत चुकीची असून, महिना ते दोन महिन्यांत बैठकी घेतल्या तर विकासकामांबाबत चर्चा करून विकासकामे मार्गी लागण्यास मदत होईल. तरी प्रत्येक महिन्यात प्रत्येक समितीची बैठक घ्यावी, अशी मागणी माने यांनी केली. आनंदा कोरे यांनी कोरोनामुळे वर्षभर बैठक घेतली नसल्याचे सांगून आगामी काळात प्रत्येक महिन्याला बैठक घेतली जाईल, असे आश्वासन दिले.
फोटो : रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथील पालिकेत विविध विषय समित्यांच्या नूतन सभापतींच्या निवडी नगराध्यक्ष आनंदा कोरे यांच्या उपस्थितीत पीठासन अधिकारी ज्योती पाटील यांनी जाहीर केल्या.
(छाया : जयदीप जाधव)