नागठाणे : विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅव्हल्सवर बोरगाव पोलिसांनी बुधवारी रात्री कारवाई केली. या कारवाईदरम्यान ट्रॅव्हल्सवर दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, दि. २ जून रोजी रात्री ११.३० वा. सुमारास बोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांना पाटण येथून एक ट्रॅव्हल्स काही प्रवाशांना घेऊन मुंबईकडे रवाना होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे डॉ. सागर वाघ यांनी निवडक कर्मचाऱ्यांना याबाबत कारवाई करण्याचा सूचना दिल्या. त्यानुसार मौजे बोरगाव (ता. सातारा) गावच्या हद्दीतील बोरजाई मंदिराच्यासमोर रात्री १०.३० वाजता ट्रॅव्हल्स (एमएच ०४ जीटी १२५६) आली असता पोलिसांनी बाजूला घेऊन थांबविली. त्या वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशानुसार अत्यावश्यक कारणाशिवाय वाहतुकीस जिल्हाबंदी असताना देखील ट्रॅव्हल्समधून साधारण ५२ प्रवासी हे पाटण ते मुबंई असा प्रवास करीत असल्याने त्यांच्याकडे ई-पास तसेच कोविड टेस्ट तपासणीची मागणी केली असता त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे मिळून आली नाहीत. त्यानंतर ट्रॅव्हल्सचालक याच्याकडे अहवालाची तसेच प्रवासी वाहतुकीची परवानगीची कागदपत्रे मागणी केली असता त्यांच्याकडूनही कोणतीही कागदपत्रे मिळून आली नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ट्रॅव्हल्सचालक लालासो लक्ष्मण पवार (वय ३५, रा. जळव, ता. पाटण) यावर दहा हजारप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ तसेच हवालदार विजय साळुंखे, सत्यम थोरात, विशाल जाधव यांनी केली.