प्रमोद सुकरे - कऱ्हाड विधानसभा निवडणुकी पाठोपाठ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँगे्रसने माजी मंत्री विलासराव पाटील - उंडाळकरांना मदतीचा हात देऊ केलाय. कऱ्हाडला विकास सोसायटी मतदार संघातून राष्ट्रवादीने उमेदवारच उभा केलेला नाही; पण उंडाळकरांनी गतवेळीप्रमाणे पाठिंबा घेत चिन्ह मात्र सोयिस्करपणे बाजूला ठेवलंय. तालुक्याच्या राजकारणात याचीच चर्चा आहे.एकेकाळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नेतृत्व करणारे विलासराव पाटील - उंडाळकर यंदा अपक्ष म्हणून कऱ्हाडमधून एकटेच लढत आहेत. राष्ट्रवादीने त्यांना बरोबर घेण्याचीच भूमिका बजावली आहे. त्यामुळे यावेळीही राष्ट्रवादीने त्यांच्या विरोधात उमेदवार देणे सोयिस्करपणे टाळले आहे. पक्षात किंवा पॅनेलमध्ये न येताच ‘राष्ट्रवादी’ उंडाळकरांवर एवढी का मेहरबान आहे, हे कार्यकर्ते समजून घेण्याचा प्रयत्न करताहेत.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने उंडाळकरांऐवजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली. त्यावेळी नाराज उंडाळकरांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर तोंडसुख घेतले. मग काय राष्ट्रवादीनेही उंडाळकरांना थेट आपल्याकडून चव्हाणांविरोधात लढण्याचे निमंत्रण देऊन टाकले; पण उंडाळकरांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. मग उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली; पण पुन्हा ती रद्द करून उंडाळकरांना राष्ट्रवादीने पुरस्कृत केले. मात्र उंडाळकरांनी राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हातात बांधले नाही.जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उंडाळकरांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका सुरूवातीपासून घेतली. तर बंडखोर खासदार उदयनराजे भोसलेही उंडाळकरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे उंडाळकर परिवर्तनाच्या ‘विमानात’ बसणार की राष्ट्रवादीच्या ‘कपबशी’तून मैत्रिपूर्ण चहा पिणार, याची साऱ्यांनाच उत्सुकता होती; पण उंडाळकरांनी हातात चक्क ‘किटली’घेत अपक्ष लढण्यातच धन्यता मानली आहे. राष्ट्रवादीनेही त्यांच्या विरोधात उमेदवारच उभा न करता त्यांना मदत करण्याचाच अप्रत्यक्ष निर्णय घेतला आहे. उंडाळकरांविरोधात आटकेकर पैलवान धनाजी पाटील दोन हात करीत आहेत. ‘पाठिंबा हवा; पण चिन्ह नको’ ही भूमिका उंडाळकरांनी विधानसभेलाही घेतली होती. मात्र, त्याचा फायदा त्यांना झालेचा दिसला नाही. आता जिल्हा बँक निवडणूकीतही उंडाळकर तोच फॉर्म्युला पुन्हा वापरत आहेत.
उंडाळकरांना पाठिंबा हवा; पण चिन्ह नको!
By admin | Updated: April 28, 2015 23:45 IST