वाई : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी इच्छुकांची मनधरणी करण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांची दमछाक होत असतानाच राष्ट्रावादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बँकेची सत्ता गाजवणाऱ्या राम-लक्ष्मण जोडीलाच लक्ष केल्याने राष्ट्रवादी पुढे आणखी पेच वाढला आहे़ उदयनराजे यांनी खंडाळ्यातील बैठक आटोपून वाई येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हा बँकेच्या निवडणूक संदर्भात पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षावर आरोप-प्रत्यारोप करीत पक्षाला घरचा आहेर दिला आहे़उदयनराजे म्हणाले की, ‘जिल्हा बँकेच्या कारभाराविषयी मी पोट तिडकीने आवाज करीत वेळोवेळी सामान्यांच्या हितासाठी बँकेतील राजकारण व घडामोडी लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. प्रस्थापितांना खड्यासारखे बाजूला ठेवून नवीन चेहऱ्यांना संधी मिळणे आवश्यक आहे़ सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही सातारा जिल्ह्यात असून, तिची सूत्रे बारामतीतून हालविली जातात, ती काय पुणे जिल्ह्याची बँक नव्हे़ बँकेतील राजकारण सत्ताधाऱ्यांनी कोणालाही कळून दिले नाही़ बारामतीकरांना खूश करण्यासाठी या राम-लक्ष्मण जोडीने जिल्ह्याचा स्वाभिमान गहाण टाकला आहे़ जिल्ह्यातील आठ आमदार व एक खासदार जिल्ह्याचे मालक नसून जिल्ह्यातील वीस लाख जनता हीच खरी मालक आहे़ सत्तेच्या विकेंद्रीकरणाऐवजी हे लोक सत्तेचे केंद्रीकरण करतात. जिल्हा बँक, साखर कारखाने, पंचायत समिती, आमदारकी, खासदारकी हे सर्व याच लोकांना पाहिजे़ हे लोक कुटुंब केंद्रित राजकारण करतात, असे राज्यात कुटुंब केंद्रित राजकारण करणाऱ्या कुटुंबांना जनतेने धडा शिकविला आहे़ तुमच्यात हिंमत असेल तर मी गांधी मैदानावर खुल्या चर्चेस तयार असून, एकदाच आपला सोक्षमोक्ष होऊन जाऊ द्या, असे खुले आव्हानही त्यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी) किसन वीर कारखान्यावर पाचशे कोटींच्या कर्जाचा बहाणा करून राष्ट्रावादीने या निवडणुकीतून माघार घेतली आहे़; पंरतु त्यांनी या रकमेतून कारखान्यावर डोंगरावएवढे विविध प्रकल्प उभारले यातून ते कर्ज फेडण्यासाठी सक्षम आहेत़ इतरांसारखे सहकार मोडून कारखान्याचे खासगी करून घशात घातले नाही. जरंडेश्वरचा गुरू कोण आहे, हे मी शोधून काढणार आहे. बँकेची निवडणूक झाल्यानतंर त्याच्या घशातून कारखाना काढून जनतेच्या स्वाधीन करणार आहे़ खर्डेकर, पोळ, वाठारकरांना आपल्यामुळेच संधी मी आग्रहाची भूमिका घेतल्यानेच दादाराजे खर्डेकर, सदाशिव पोळ व विलासबापू वाठारकर यांना बँकेच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली, असा दावाही उदयनराजेंनी यावेळी केला.
‘राम-लक्ष्मणा’च्या जोडीवर उदयनराजेंनी डागली पुन्हा तोफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2015 00:04 IST