खटाव : खटावमधून सुमारे दोन वर्षांपूर्वी अचानक गायब झालेल्या कोमल कांबळे (वय ८) या चिमुरडीचा अद्याप कसलाच शोध न लागल्याने कोमलचे वडील दीपक कांबळे यांनी तिचे अपहरण झाल्याची तक्रार पुसेगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.दि. ६ जानेवारी २०१३ रोजी अंगणात खेळत असताना कोमल अचानक बेपत्ता झाली. बराच वेळ दृष्टीस न पडल्याने आई सोनाली कांबळे यांनी परिसरात कोमलचा शोध घेतला. मात्र, तिचा कुठेही पत्ता लागला नाही. यानंतर कांबळे दाम्पत्यानी सर्वत्र शोधाशोध करून नातेवाइकांकडे तिची चौकशी केली होती, तरीही तिचा कसलाच थांगपत्ता लागला नाही. या घटनेनंतर मात्र दीपक कांबळे यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात कोमल हरविल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल होताच पोलिसांनी कोमलला जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर अनेक ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोमलचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. कोमल गायब झालेल्या घटनेला आज (बुधवारी) एक वर्ष, दहा महिने पूर्ण झाले; मात्र आजतागायत कोणतेही धागेदोगे सापडले नाही. अखेर कोमलचे वडील दीपक कांबळे यांनी मंगळवारी पुसेगाव पोलीस ठाण्यात कोमलचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे करत आहेत. (वार्ताहर)कोमलचा सर्वांनाच लळा लागला होता. आजही आम्हाला कोठूनही थोडासा जरी सुगाव लागला तरी आम्ही सर्वजण आमची मुलगी सापडेल, या आशेवर वेड्यासारखे त्या दिशेने धाव घेतोे. कोमलविना आमचे घर सुने-सुने झाले आहे. - दीपक कांबळे (कोमलचे वडील)
दोन वर्षानंतर अपहरणाची तक्रार
By admin | Updated: November 27, 2014 00:18 IST