जगदीश कोष्टी- सातारा--मेडन, इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या चौथ्या फिबा आशियाई करंडक बास्केटबॉल स्पर्धेत भारतीय संघातून दोन सातारकर झुंज देत आहेत. येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयातील ॠतुजा जयवंत पवार ही युवा खेळाडू भारतीय संघातून खेळत असून, तिने पहिल्या सामन्यात १३ तर दुसऱ्या सामन्यात १२ पॉइंटने सर्वोत्तम खेळी केली आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून साताऱ्यातीलच अभय चव्हाण काम पाहत आहेत. इंडोनेशियामध्ये सध्या फिबा आशियाई करंडक बास्केटबॉल स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत सहभागी होता यावे, प्रत्येक खेळाडूचे महत्त्वकांक्षा असते. मात्र, ती प्रत्येकाला मिळतेच असे नाही. स्पर्धेतील सोळा वर्षांखालील महिलांच्या भारतीय संघात माहुली, ता. सातारा येथील ॠतुजा जयवंत पवार हिचा समावेश आहे. ती आतापर्यंत डझनावरी स्पर्धेत सहभागी झाली आहे. या अनुभवाच्या जोरावर तिने ‘फिबा’मध्ये १२ पाइंट मिळवून तिने भारतीय संघात सर्वोत्तम स्थान मिळविले आहे.ॠतुजाने आजवर शालेय, विद्यापीठ व राष्ट्रीयस्तरावर देदीप्यमान कामगिरी केली आहे. यामध्ये वर्षांखालील मुलींच्या संघात २०११ मध्ये दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत रजत, २०११ मध्येच लखनऊ येथे झालेल्या स्पर्धेत ब्राँझ, २०११ मध्ये छत्तीसगड येथे झालेल्या स्पर्धेतून कास्य पदक मिळविले होते. बास्केटबॉल हा सांघिक खेळ आहे. यामध्ये स्थान मिळविणंच अवघड असतं. सांघिक स्पर्धेत चांगले प्रदर्शन करता आल्याने तिची कर्णधारपदीही निवड करण्यात आली होती. यामध्ये मे २०१२ मध्ये गोवा, डिसेंबर २०१३ मध्ये छत्तीसगड येथे झालेल्या स्पर्धेत तिने कर्णधारपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. सोळा वर्षांखालील महिलांच्या भारतीय संघात खेळण्याची संधी ॠतुजाला नोव्हेंबर २०१२ नंतर मिळाली. भारतीय संघाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने खुल्या गटात यशस्वी कामगिरी केली. यामध्ये २०१४ मध्ये राजस्थानमध्ये झालेल्या ‘सॅनिआॅन’ ओपन स्पर्धेत तिने रजत पदक जिंकले. २०१५ मध्ये ‘फिबा’ स्पर्धेसाठी तिची भारतीय संघात निवड झाली. या संघात राज्यातील दोनच खेळाडू असून, त्यातील एक नागपूरची आहे. या स्पर्धेत जपान, थायलॅण्ड, चीन यांच्यासमवेत तिने उत्कृष्ट खेळ केला असून, सर्वाधिक १२ पॉइंट मिळविण्याची कामगिरी ॠतुजाने केली आहे. ॠतुजाचे शालेय शिक्षण केएसडी शानभाग विद्यालयात झाले असून, तेथील अभिजित मगर हे तिचे गुरू आहेत. ती आजही त्यांच्याकडे धडे गिरवत असून, दररोज सायंकाळी पाच ते साडेसात अडीच तास कसून सराव करत आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षकही साताऱ्याचेच इंनोनिशायत सुरू असलेल्या फिबा आशियाई बास्केटबॉल स्पर्धेतील सोळा वर्षांखालील महिलांच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून अभय चव्हाण यांच्या खांद्यावर जबाबदारी आली आहे. ते मूळचे सातारा येथील असून, सध्या ते सांगली जिल्हा क्रीडा विभागात प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. सध्या सुरू असलेल्या भारतीय संघाला नवी दिल्ली येथे गेल्या दीड महिन्यापासून प्रशिक्षण दिले आहे. प्रशिक्षक म्हणून चव्हाण यांची कामगिरीही चांगलीच राहिली असून, युरोपमध्ये २०१३ मध्ये झालेल्या वर्ल्ड स्कूल चॅम्पियनशिप, चीनमध्ये २०१४ मध्ये झालेल्या सोळा वर्षांखालील महिला संघ, श्रीलंका येथे २०१४ मध्ये झालेल्या सोळा वर्षांखालील महिलांचा संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय पंधरा ते वीस लहान-मोठ्या स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.ॠतुजामध्ये चांगली कामगिरी करण्याचे गुण आहेत. ‘फिबा’मध्ये सहभागी होणे सोपे नाही. त्याठिकाणी जाऊन तिने भारतीय संघात सर्वात चांगली खेळी केली आहे. - अभिजित शानभाग, प्रशिक्षक..जिल्हा बास्केटबॉल संघटना पाठीशीॠतुजाला पुढील स्पर्धासाठी सातारा जिल्हा बास्केटबॉल संघटना मदत करत आहेत. यामध्ये संघटनेचे पदाधिकारी रमेश शानभाग, हेमंत जाजू, संकेत शानभाग, सातारा जिमखान्याचे सुधाकर शानभाग यांचे सहकार्य लाभत आहे.
जगाला भिडले दोन सातारकर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2015 22:13 IST