फलटण : फलटण ते पंढरपूर मार्गावर फलटण तालुक्यातील पिंपरद येथे एका दुचाकीचा आणि चार चाकी गाडीच्या अपघातात दोन तरुण जखमी झाले आहेत. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात वाहनचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, फलटण-पंढरपूर मार्गावर पिंप्रद गावालगत व्यसनमुक्ती युवक संघ महाराष्ट्र प्रवेशद्वारसमोर गुरुवार, २६ रोजी सायंकाळी चारच्या सुमारास दुचाकी (एमएच ११ बीडब्लू २२८२) आणि चारचाकी गाडीचा अपघात झाला. या अपघातात रोहित अण्णासाहेब भगत (वय २०), तुषार अण्णासाहेब भगत (२२, दोघे रा. पिंप्रद ता. फलटण) हे दोन तरुण जखमी झाले आहेत.
चारचाकी गाडीने दुचाकीवरून चाललेल्या दोघा तरुणांना पाठीमागून धडक देऊन सुमारे १५० ते २०० मीटर गाडीसह फरफटत नेले. अपघातानंतर दुर्घटनेतील चारचाकी वाहनाचा चालक पसार झाला आहे. या अपघातात जखमी झालेले तरुण पिंप्रद गावातील असून, ते आपल्या शेतामध्ये शेतीला पाणी देण्यासाठी निघाले होते. यावेळी हा अपघात घडला. घटनास्थळावरून अपघात करून पसार झालेल्या चारचाकीचालकाचा फलटण ग्रामीण पोलीस शोध घेत आहेत.