परळी : येता-जाता सहज म्हणून वणवा लावण्याच्या विघ्नसंतोषी प्रवृत्तीने रविवारी दोन मुक्या जिवांवर प्रहार केला. दोन अल्पवयीन मुलांनी लावलेली आग पसरत गोठ्यापर्यंत गेल्याने दोन बैल होरपळले असून, लाकूडफाटा, गवत जळून खाक झाल्याने सुमारे एक लाख तीस हजारांचे नुकसानही झाले. परळी खोऱ्यातील कुस बुद्रुक येथे ही घटना घडली. तेथील जुन्या बसस्थानकाशेजारी लहू रामचंद्र लोटेकर यांचा गोठा आहे. सकाळी ते शेतात मशागतीसाठी बैलजोडी घेऊन गेले होते. दुपारी बाराच्या सुमारास माघारी येऊन त्यांनी बैल गोठ्यात बांधले. दरम्यान, दोन अल्पवयीन मुलांनी जुन्या बसस्थानकानजीक रस्त्याकडेला असलेल्या वाळक्या गवताला सहज म्हणून आग लावली. ही आग वाढत जाऊन गोठ्याला भिडली. आग भडकताच या मुलांनी तेथून पळ काढला. वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. ग्रामस्थ घटनास्थळी येईपर्यंत गोठ्यातील दोन्ही बैल होरपळून गंभीर जखमी झाले होते. आगीत गोठ्यात ठेवलेला लाकूडफाटा आणि गवत जळून सुमारे एक लाख तीस हजारांचे नुकसान झाले. तलाठ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि लोटेकर यांना नुकसान भरपाईचे आश्वासन दिले. सातारा तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. (वार्ताहर)बैलांची चाळीस फुटांवरून उडीगोठ्याला आग लागल्याने बैल होरपळू लागले तेव्हा बैलांनी प्राण वाचवण्यासाठी दावे तोडले. एवढेच नव्हे तर तेथून चाळीस फूट खोल असणाऱ्या दरीत उडी मारली आणि आगीपासून स्वत:चे रक्षण करण्याचा प्रयत्न केला. तथापि, यामुळे एका बैलाचे शिंग तुटले.
आगीत दोन बैल होरपळले
By admin | Updated: April 27, 2015 00:12 IST