सातारा : ‘अरे तो बघ... पांढरपट्टे त्याच्यासारखाच दिसतोय, तोच असेल ना...,’ अशी भावनिक साद घालत माजी सैनिक एकमेकांशी आपल्या भावना व्यक्त करत होते. अण्णा हजारे यांचे भाषण ऐकण्याची ओढ अनेकांना होती; मात्र त्यापेक्षा वीस-पंचवीस वर्षांपूर्वी आपल्या वेळचे ओळखीचे चेहरे दिसतायज का? हे भिरभिरत्या डोळ्यांनी प्रत्येकजण शोधत होते. मेळावा संपल्यानंतर एकमेकांना भेटून जुन्या आठवणींनी अनेकजण गहिवरले. तर काहींचे डोळे पाणावले. हे दृश्य होते... ‘वन रँक... वन पेन्शन’साठी एकत्र आलेल्या माजी सैनिकांच्या मेळाव्यातील. साताऱ्यात माजी सैनिकांचा ‘वन रँक... वन पेन्शन’च्या मागणीसाठी रविवारी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद, उस्मानाबाद आदी ठिकाणांहून माजी सैनिक उपस्थित होते. मेळावा बारा वाजता सुरू होणार होता; तत्पूर्वीच अनेकजण तेथे दाखल झाले होते. काही माजी सैनिक आपल्या जागेवर बसण्यापूर्वी एकमेकांशी गप्पा मारण्यात दंग होते. समोरून आलेल्या व्यक्तीच्या डोळ्यावर चष्मा. डोक्यावर गांधी टोपी पाहून ‘हा तर पांढरपट्टे नाही ना,’ अशी एकमेकांना बोलून खातरजमा केली जात होती. ‘अरे तोच आहे.’ त्याचा चेहरा बदलला असला तरी त्याचा चालण्याचा रुबाब तोच आहे. अशी पेहराव पाहून खात्री केली जात होती. एक साठी ओलांडलेला माजी सैनिक त्यांच्याजवळ आला. ‘अरे तू पांढरपट्टे ना,’ असं त्यांनी विचारलं. समोरून उत्तर आलं, ‘होय मी पांढरपट्टे... तू सोनकुळे का?,’ असे बोलताच एकमेकांची ओळख पटली. त्यांनी एकमेकांना घट्ट मिठ्ठी मारून ‘अरे तू किती बदललास, कुठे राहातोय, आता काय करतोस, मुलंबाळ काय करतात,’ अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. मेळाव्याच्या निमित्ताने जुने ॠणानुबंध पुन्हा घट्ट झाल्याने त्यांच्या आजूबाजूच्या सहकाऱ्यांना गहिवरून आले. दुसरा किस्सा कार्यालयात घडला. अण्णा हजारे यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी काही निवडक माजी सैनिकांचे भाषण सुरू होते. कार्यालय अगदी खचाखच भरले होते. अण्णांच्या समोर खाली फरशीवर बसलेल्या माजी सैनिकांमध्ये हळू आवाजात गप्पा रंगल्या होत्या. अण्णांचा मेळावा खरंच नशीबवान ठरला. माझ्या प्लाटूनचा उस्मानाबादचा तिरकावले भेटला. तो फार आळशी होता. सारखा सुटीवर घरी जायचा. एक दिवस त्याने पळून जाण्याचा निर्णय घेतला; परंतु त्याच्या प्लाटूनमधील एका पोऱ्याने त्याला समजावून सांगितले. त्यामुळे त्याने फौजची नोकरी पूर्ण केली. अशा जुन्या आठवणींना त्यांनी वाट मोकळी करून दिली.
तब्बल वीस वर्षांनी माजी सैनिकांची गळाभेट
By admin | Updated: August 23, 2015 23:50 IST