हरीदयाळ रंजनदास गुप्ता (रा. सॉक्रेटीस ३, रूम नं. ११०९, १० माळा, सुपर टेक, ओमीक्रॉन, ग्रेटर नोएडा, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड शहरातील युवकांना शेअर मार्केटमधून कमी दिवसांत जादा टक्केवारीने पैसे परत देण्याचे आमिष दाखवून हरीदयाळ गुप्ता याने कऱ्हाडातील युवकांच्याकडून १९ लाख ८७ हजार ५०० रुपये रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यावर मागवून घेतली. ती रक्कम परत न देता पळून गेला होता. याबाबत त्याच्यावर कऱ्हाड शहर पोलिसांत फिर्याद दाखल होती. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी शहर पोलीस ठाण्यास दाखल असलेल्या ठकबाजी व फसवणुकीचे गुन्हे उघड करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कऱ्हाड शहर पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, पोलीस नाईक तानाजी शिंदे, प्रफुल्ल गाडे, मारुती लाटणे, विनोद माने यांनी ठकबाजी व फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी माहिती गोळा केली. त्यामध्ये दिल्ली व नोएडा भागातून हरीदयाळ गुप्ता यास अटक केली. त्याच्याकडून तीन मोबाईल व एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वीस लाखांचा गंडा घालणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:07 IST