फलटण : निंभोरे (ता फलटण) हद्दीतील मॅग पेट्रोल पंपावरून १९ लाख रुपये किमतीचा बारा चाकी टँकर चालकानेच लंपास केल्याची घटना घडली आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी रामेश्वर महादेव पारीसकर (रा. नवले ब्रीज, पुणे) यांनी मल्लिकार्जुन ट्रान्सपोर्ट कंपनीमधून बाराचाकी टँकर (एमएच २०- ईजी ४१५३) हा भीमाशंकर पारगाव कारखाना येथे पाठून दिला असता. टँकरचा बिघाड झाल्याने टँकर फलटण तालुक्यातील निंभोरे गावच्या हद्दीतील मॅग पेट्रोल पंपावर थांबवण्यात आला होता. पाच ते सहा दिवसांनी दुरुस्ती होऊन टँकर सुरू झाल्यानंतर दि. २३ मार्च रोजी रात्री दहाच्या सुमारास मल्लिकार्जुन ट्रान्सपोर्टचा टँकर चालक महेश गोपीनाथ वाघमारे (वय ३२, रा. कण्हेरगाव ता. माढा जि. सोलापूर) याने टँकर भीमाशंकर कारखान्यावर पोहचवला नसल्याचे रामेश्वर यांच्या लक्षात आले. त्यानंतर चालक आपला टँकर घेऊन फरार झालेला असल्याबाबतची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक नितीन सावंत तपास करीत आहेत.