याबाबत एसटी आगार आणि ग्रामीण रुग्णालय येथून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी बारा वाजता पाटण आगारातून सुटलेली अवसरी एसटी ( क्र. एमएच १२ ईएफ ६८४५) दुपारी गावात पोहोचली. प्रवाशांची चढ-उतार झाल्यानंतर पुन्हा एसटी पाटणकडे येण्यासाठी निघाली. एक वाजण्याच्यासुमारास एसटी कारवट गावच्या हद्दीत पोहोचली असताना, अचानक एसटीचे चाक निखळून पडले. त्यामुळे एसटी रस्ता सोडून बाजूच्या खोल नाल्यात जाऊन धडकली. या अपघातात अनुसया शिंदे, पारूबाई शिंदे, यशोदा शिंदे, विलास पवार (सर्व रा. कारवट), शोभा निकम, शैलेश देसाई (दोघे रा. म्हारवंड), जगाबाई यमकर. धोंडीबा यमकर (दोघे रा. जोगीटेक), ऋषिकेश निकम, प्रकाश बावधने (दोघे रा. काठीटेक), एसटीचालक उत्तम सूर्यवंशी (रा. घाणव) व वाहक शराफत शेख हेसुद्धा जखमी झाले. जखमींपैकी जगाबाई यमकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
अपघात निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेऊन जखमींना मिळेल त्या वाहनातून उपचारासाठी पाटणच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
याबाबत पाटण पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता, ठाणे अंमलदार देशमुख यांनी सांगितले की, एसटीच्या अपघाताबाबत अद्यापही पोलिसात फिर्याद देण्यास कोणीही आलेले नाही.
फोटो : ३०केआरडी०६
कॅप्शन : कारवट (ता. पाटण) येथे अचानक चाक निखळल्याने एसटीचा अपघात झाला. या अपघातात एसटीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. (छाया : अरुण पवार)