वडूज : वडूज रनर्स फाऊंडेशनच्या सदस्यांनी दहा ते सत्तावीस किलोमीटर धावून देशाचे धावपटू मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. युवा पिढीत जनजागृती व्हावी या उदात्त हेतूने निरोगी राहण्यासाठी संदेश ही दिले.
वडूजमधील काही भूमिपुत्र दहा वर्षांपासून वेगवेगळ्या माध्यमांतून प्रबोधन करीत आहेत. वडूज रनर्स फाऊंडेशनच्या सदस्यांनी त्याचाच एक भाग म्हणून माणदेशी हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. १ डिसेंबर २०१९ ला गोंदवले ते वडूज अशी २१ किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये राज्यातून सुमारे अडीच हजार नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता.
रविवारी पहाटे आणि सायंकाळी हमरस्ते सोडून भव्य पटांगणावर धावणे व चालणे यासारख्या व्यायामाची कसरत करताना अनेकजण आढळून येतात. वडूज रनर्स फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येऊन युवा पिढीला व्यायामाचे प्रबोधन सुरू आहेत. धावपटू मिल्खा सिंग यांच्याकडून प्रेरणा सर्वांना मिळावी यासाठी वडूज रनर्स फाउंडेशनच्या सदस्यांनी वडूज-पुसेगाव रस्त्यावर धावून मिल्खा सिंग यांना अनोखी श्रद्धंंाजली वाहिली.
यामध्ये डॉ. अजित इनामदार यांनी, डॉ. महेश काटकर, गोरांग देशमुख यांनी दहा किलोमीटर, डॉ. कुंडलीक मांडवे अकरा तर अभिषेक इनामदार २७ किलोमीटर धावले.
चौकट
नियमित व्यायाम, विषमुक्त आहार व योग्य प्रमाणात निद्रा या त्रिसूत्रीचा वापर करुन निरोगी व आनंदी राहण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. जे व्यायाम करत नसतील त्यांनी २१ जून जागतिक योग दिनाच्या मुहूर्तावर व्यायामास सुरुवात करुन सातत्य ठेवावे. प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्याने वेगवेगळ्या रोगांना सामोरे जाताना या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास रोगप्रतिकारक्षमता वाढेल.
- डॉ. कुंडलिक मांडवे,
सदस्य, वडूज रनर्स फाउंडेशन
फोटो :
वडूज-पुसेगाव रस्त्यावर धावून वडूज रनर्स फाऊंडेशनच्या सदस्यांनी रविवारी मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. (छाया : शेखर जाधव )