कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. तिरंगी लढतीचे चित्र असल्याने इच्छुकांची मांदियाळी आहे. तरीही बुधवार दि. १० रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून उद्या तिन्ही पॅनेलचे उमेदवार निश्चित होवून निवडणूकीचे चित्रही स्पष्ट होईल. कृष्णेच्या इतिहासात यंदा प्रथमच तिरंगी लढत होणार आहे. विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल, डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले यांचे सहकार पॅनेल तर मदनराव मोहिते, इंद्रजित मोहिते यांचे रयत पॅनेल रिंगणात उतरले आहे. तिन्ही पॅनेलकडून २९८ इच्छूकांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यातील २५० जणांचे अर्ज आजही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आहेत. बुधवार दि. १० रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. तिन्ही पॅनेलचे नेते गेले ४ दिवस आपापल्या पॅनेलचे उमेदवार निश्चित करण्यात गुंतले आहेत. मात्र इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. दोन जिल्ह्यातील चार तालुक्यात २१ उमेदवार विभाग निहाय देताना त्यांना कसरत करावी लागत आहे. एकाचं नाव निश्चित केले की इतर चार जण नाराज होत आहेत.त्यांना समजावून सांगून अर्ज मागे घेण्याची विनंती करण्यात येत आहे. पण कार्यकर्ते ऐकता ऐकायला तयार होत नाहीत. जो तो आपल्या उमेदवारीसाठी फिल्डींग लावून आहे. शक्तीप्रदर्शन वरिष्ठ नेत्यांचे फोन याद्वारे दबावतंत्र सुरू आहे. त्यामुळे नेत्यांनाही पॅनेल निश्चित करताना अडचणी येत आहेत. मात्र बुधवार दि. १० जून अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याने उद्या नेत्यांना निर्णय तर घ्यावाच लागेल. दुपारी ३ वाजता मुदत संपताच निवडणूकीचे अंतिम चित्र स्पष्टहोईल. (प्रतिनिधी) अर्ज माघारीसाठी प्रमुखांची धावपळआज दिवसभर तिन्ही पॅनेलच्या प्रमुखांनी अनेक इच्छूकांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली. त्याला अर्ज मागे घेण्याचा अर्जही भरून हातात दिला. त्यावर त्यांनी सहीही केली. पण अर्जमागे घेण्यासाठी ते निवडणूक कार्यालयात न जाता चक्क आपापल्या घरी निघून गेलेत. त्यामुळे नेत्यांची धाकधूक वाढलीच आहे.
‘कृष्णे’साठी तिरंगी लढत निश्चित!
By admin | Updated: June 10, 2015 00:31 IST