कऱ्हाड/तांबवे : कऱ्हाड तालुक्यातील वारुंजी, केसे, पाडळी आणि सुपने या तीन गावांना शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडे मोडून पडली. तर केसे येथे वीज खांबही जमिनदोस्त झाले. तसेच विजांच्या कडकडाटासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले.
तालुक्यात गत काही दिवसांपासून ठिकठिकाणी वळवाचा पाऊस हजेरी लावत आहे. गत आठवड्यात कऱ्हाड दक्षिणेतील नांदगावसह परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली होती. तर कऱ्हाड शहरातही जोरदार पाऊस झाला होता. शनिवारीही सायंकाळी पावसाचे वातावरण तयार झाले. पाऊस कोसळण्याची चिन्हे असल्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने वाळवण गोळा करण्यास सुरुवात केली. अशातच सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वारुंजी, केसे, पाडळी व सुपने परिसराला मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरुवात झाली. यावेळी मोठ्या प्रमाणावर गारपीटही झाली. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. या भागात गुऱ्हाळगृहांची संख्या जास्त आहे. मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने गुऱ्हाळगृहांची घरघर थांबली.
केसे येथील तांबी नावाच्या शिवारात गारांचा खच पडल्याचे दिसून आले. गारांच्या माऱ्यामुळे अनेक पिकांची पाने फाटली आहेत. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे केसे येथे अनेक घरांवरील पत्र्याची पाने उडाली. झाडे मोडून पडली. गावात एक झाड कारवर मोडून पडल्याने कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शिवारातही अनेक ठिकाणी झाडे मोडून पडली. गावातील विजेचे खांबही जमीनदोस्त झाले. यावेळी विजांचा कडकडाट झाल्यामुळे केसे गावातील अनेकांचे टीव्ही, मिक्सर, फ्रीज अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे वायरिंग जळून त्या नादुरुस्त झाल्या. केबल अनेक ठिकाणी तुटून पडली. अचानक झालेल्या या वादळी वाऱ्याने केसे गावात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
- चौकट
दोन दिवसांनी होणार वीजपुरवठा पूर्ववत
दरम्यान, वीज खांबांवर झाडे मोडून पडल्याने केसे गावातील वीजपुरवठा शनिवारी सायंकाळपासून खंडित झाला आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत तो पूर्ववत झाला नव्हता. तसेच काही घरगुती वीज उपकरणांचेही नुकसान झाले असून पंचनाम्याचे काम महसूल विभागाने हाती घेतले आहे. गावातील वीजपुरवठा सुरळीत होण्यास दोन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
फोटो : ०२केआरडी०३
कॅप्शन : केसे, ता. कऱ्हाड येथे जोरदार वाऱ्यामुळे वीज खांब जमीनदोस्त झाले. (छाया : दीपक पवार)
फोटो : ०२केआरडी०४
कॅप्शन : केसे येथे जोरदार वाऱ्यामुळे झाडे मोडून पडली. (छाया : दीपक पवार)
फोटो : ०२केआरडी०५
कॅप्शन : कारवर झाड कोसळल्यामुळे केसे येथे कारचे नुकसान झाले. (छाया : दीपक पवार)