साई सावंत - सातारा -वेळ रात्री बाराची. ठिकाण मार्केट यार्ड परिसर. एकीकडं आख्खं सातारा शहर निद्रावस्थेत गेलं असताना दुसरीकडं मात्र रात्रीच्या अंधारात अनेक घडामोडी घडताना ‘लोकमत टीम’ आपल्या कॅमेऱ्यात टिपल्या. सध्याच्या युगात घरोघरी गॅस कनेक्शन पोहोचले असले तरी अजून गरीबांची चूल सरपणाशिवाय पेटत नाही, याचं जळजळीत सत्य समोर आलं. उद्याची चूल पेटविण्यासाठी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड येथे एका ठिकाणी पडलेल्या आंब्याच्या लाकडी पेट्या उचलून नेताना एक महिला आढळली. तिच्या चेहऱ्यावर सरपण मिळाल्याचं भयमिश्रित समाधान दिसत होतं.दिवसा गर्दीनं गजबजलेला पोवईनाका रात्री ११.५० वाजता मात्र शांत वाटला. पोवई नाक्यावरून ‘लोकमत टीम’ महामार्गावरील हालचाली टिपण्यासाठी गेली. महामार्गावरून वाढे फाटा परिसरात गेल्यानंतर रात्री १२.४५ वाजण्याच्या सुमारास हा चौक जागा असल्याचे दिसले. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अगोदरच सातारकर उकाड्याने हैराण झाले आहेत. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत चौकाचौकात गप्पांचे फड रंगलेले दिसून आले. या चौकातही काही जण चहा पीत उभे होते, तर काही जण उभ्या केलेल्या दुचाकीवर बसून गप्पा मारत होते. महामार्गावरून मोठ्या वाहनांची वाहतूक जास्त प्रमाणात सुरू असल्याचे पाहायला मिळाले.
चुलीच्या सरपणासाठी रात्रभर ‘खोक्यांचा प्रवास’
By admin | Updated: May 25, 2016 00:52 IST