नितीन काळेल -सातारा --विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुंदोपसुंदीला वेगळाचा ‘ट्रॅक’ मिळाला आहे. विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी पक्षातीलच काहीजणांना फटकारले असून, ‘त्यांचा’ व पक्षाचा कोणताही संबध नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ‘मनसे’च्या रेल्वेइंजिनचे डबे ट्रॅकबाहेर पडत असल्याचेच हे द्योतक समजले जात आहे. पक्षातील ही धुसफूस कोणते वळण घेणार हे मात्र अनिश्चित आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘मनसे’चे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांनी पक्षत्याग केला व धनुष्यबाण हाती घेतला. त्यानंतर ‘मनसे’च्या विद्यार्थी सेनेतील धुसफूस वाढू लागल्याचे दिसून आले. विद्यार्थी सेनेच्या काहीजणांनी तर विधानसभा निवडणुकीत सातारा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार दगडूदादा सकपाळ यांचा प्रचार केला, असा आरोप युवराज पवार यांच्याकडून करण्यात येत आहे. तसे त्यांनी काही पुरावेही देण्याचे जाहीर केले आहे. त्यातच ‘मनसे’त असणारे संभाजी पाटील, मनोज पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कारागृहातील अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. यावर विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. संभाजी पाटील व मनोज पवार यांचा ‘मनसे’शी कसलाही संबंध नाही. पक्षाचा पदाधिकारी म्हणून कोणी धमकावले तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, असेही स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे विद्यार्थी सेनेतील वादाला आता वेगळाच टॅ्रक मिळणार असल्याचे दिसत आहे.याबाबत युवराज पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘ दि. ३१ मे २०१४ पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचा मी जिल्हाध्यक्ष आहे. संभाजी पाटील आणि मनोज पवार यांना पदमुक्त करण्यात आलेले आहे. पक्षाशी त्यांचा कोणताही संबंध राहिलेला नाही. ‘मनसे’च्या झेंड्याखाली त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. त्याच्याशी पक्षाचा कोणताही संबंध नाही. प्रशासनाला वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे.’नक्की अध्यक्ष कोण ?विद्यार्थी सेनेकडून युवराज पवार यांना दि. ३१ मे पासून जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सध्या विद्यार्थी सेनेची जबाबदारी त्यांच्याकडेच आहे. पण, संभाजी पाटील हेही स्वत:ला अध्यक्ष समजत आहेत. पाटील यांनी ‘पर्ल्स’कंपनीच्या संचालकावर गुन्हे दाखल करा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यावर पाटील अध्यक्ष व मनोज पवार हे जिल्हा सचिव म्हणून आहेत. दोघांच्याही सह्या आहेत. त्यामुळे अध्यक्ष कोण? असा प्रश्न सर्वांनाच पडणारा आहे.बोलविता धनी वेगळाच...काही महिन्यांपूर्वी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील होते. त्यानंतर युवराज पवार यांना अध्यक्षपद देण्यात आले. संभाजी पाटील व अन्य काहीजण ’मनसे’तून बाहेर पडलेल्या एका नेत्याच्या जवळचे आहेत. त्यांच्या इशाऱ्यावरच संभाजी पाटील व इतर काम करत आहेत. यांचा बोलविता धनी वेगळाच असल्याचा आरोप आरोप युवराज पवार यांनी केला आहे.
‘रेल्वे इंजिन’च्या सुंदोपसुंदीला वेगळा टॅ्रक!
By admin | Updated: November 9, 2014 23:35 IST