कऱ्हाड : बेकायदेशीर दारू वाहतूक करणारी व्हॅन पकडून पोलिसांनी एकास अटक केली. त्याच्याकडून देशी दारूच्या बॉक्ससह सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. साकुर्डी, ता. कऱ्हाड येथे शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. रवींद्र राजाराम हापसे (वय ३०, रा. सोमवार पेठ, कऱ्हाड) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड-पाटण मार्गावरून शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एका व्हॅनमधून दारू वाहतूक केली जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांना कारवाई करण्याची सूचना केली. रात्री गुन्हे शाखेचे संदेश लादे, शशिकांत काळे, अमित पवार, अमोल पवार, सचिन साळुंखे यांचे पथक तांबवे फाटा येथे पोहोचले. त्यावेळी साकुर्डीहून एक व्हॅन (एमएच ११ एके २८३४) तांबवेच्या दिशेने निघाल्याचे दिसले. पोलिसांनी व्हॅन अडवून तपासणी केली असता. त्यामध्ये देशी दारूचे बॉक्स आढळून आले. पोलिसांनी दारूच्या ३३६ बाटल्यांसह व्हॅन जप्त केली. तसेच रवींद्र हापसे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
चोरटी दारू वाहतूक रोखली
By admin | Updated: June 12, 2016 00:39 IST