सातारा : गणेशोत्सवाच्या कालावधीत ढोल-ताशा, झांझपथक अशा पारंपरिक वाद्यांना पोलिसांनी अडवणूक करू नये, ऐतिहासिक साताऱ्याची संस्कृती जपण्यासाठी साताऱ्यातील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तयार असल्याची घोषणा शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत केली. सामाजिक एकोपा वाढावा, उत्सवाचे पावित्र्य राहावे, या हेतूने पोलिस प्रशासनही सज्ज असल्याची घोषणा पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी केली. पोलिस करमणूक केंद्रातील अलंकार हॉलमध्ये ही बैठक पार पडली. उपविभागीय पोलिस अधिकारी खंडेराव धरणे, पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे, पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत प्रकाश मंडळाचे श्रीकांत शेटे, शिवसेनेचे नरेंद्र पाटील, सप्ततारा मंडळाचे राजू गोडसे, भाजपचे शहराध्यक्ष सुनील काळेकर आदींनी आपली मते मांडली. गणेशमूर्तींच्या उंचीचा मुद्दा श्रीकांत शेटे यांनी उपस्थित केला. मूर्तींची उंची जास्त आणि शहरातील वीज वाहिन्या १० ते १२ फूट उंचीवर अशी परिस्थिती असल्याने अनेकदा धोकादायक परिस्थिती निर्माण होत असते. मूर्तींच्या उंचीवर निर्बंध घालावे लागतील. उत्सवातील विविध परवान्यांसाठी ‘एक खिडकी’ योजना तत्काळ सुरू व्हावी तसेच मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उत्सव काळात इतर कामे असल्याने परवाने कमी वेळात मिळावेत, असे मुद्दे शेटे यांनी मांडले. गणेशमूर्ती विसर्जनासाठी पालिकेने कृत्रिम तळी तयार केली आहेत. राधिका रस्त्यावर जिल्हा परिषदेची ही तळ्याची जागा नगरपालिकेच्या ताब्यात मिळण्यासाठी प्रयत्न केले जावेत. या तळ्यासाठी जिल्हा नियोजनकडून निधी मिळावा, गणेशोत्सवाच्या काळात बसस्थानक परिसरातील गर्दी वाढते. या परिसरात नव्याने बसस्थानक तयार केले गेले असले तरी ते विक्रेत्यांनी बळकावले आहेत. या मार्गावरून रोज २ हजार विद्यार्थी बाहेरगावाहून साताऱ्यात शिकायला येत असतात, त्यांना चालण्यासाठी फूटपाथही नाही, त्यामुळे प्रशासनाने ही अतिक्रमणे पहिल्यांदा काढून घ्यावीत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना बक्षिसे द्यावीत. राजू गोडसे यांनी ढोल पथकांना पोलिस प्रशासनाकडून विरोध असल्याचा मुद्दा उपस्थित केला. डॉल्बी वाजविणाऱ्यांना ढिल आणि पारंपरिक वाद्ये वाजविणाऱ्यांना बंदी घालण्याचे प्रकार विसर्जन मिरवणुकीवेळी होत असतो. प्रशासनाने हे करू नये, साताऱ्यात संस्कृती जपण्यासाठी वेगळा प्रयोग होत आहे. यासाठी झांज पथकातील कार्यकर्ते कित्येक दिवस आधीपासून त्याचा सराव करत आहेत. त्यामुळे ढोल-ताशे वाजविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत परवानगी देण्यात यावी. यावर उपविभागीय पोलिस अधिकारी खंडेराव धरणे यांनी वाहतुकीला अडथळा होत असेल तरच पोलिस संबंधित पथकांना सूचना करतात. इतरवेळी नाही, असे उत्तर दिले. दरम्यान, सदर बझार येथील भारतमाता मंडळाच्या कार्यकर्त्याने झांजपथकांना सरावासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)
साताऱ्यात यंदाही पारंपरिक वाद्ये अन् कृत्रिम तळी !
By admin | Updated: August 7, 2016 01:02 IST