पांडुरंग भिलारे ।लोकमत न्यूज नेटवर्कवाई : धोम धरणात मासेमारी करणाऱ्यांनी माशांवर विषप्रयोग केल्याने धरणाच्या चहूबाजूला हजारो मृत माशांचा सडा पडला आहे. धरणातील पाण्यालाही दुर्गंधीयुक्त वास येत आहे. मासेमाºयांकडून पाण्यात गुंगीचे औषध टाकून मासेमारी केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे गेल्या पंधरा दिवसांपासून धरणात मासे मृत होण्याच्या घटनेत वाढ झाली असताना पाटबंधारे विभाग मात्र, अजूनही अनभिज्ञ आहे.धोम धरणातील नौकाविहाराचा ठेका फलटणकरांकडे आहे, तर मासेमारीचा ठेका पाटबंधारे खात्याने पुण्याच्या भाजपच्या खासदारांकडे दिला आहे. दोघांमधील वाद माशांच्या जीवावर बेतल्याची चर्चा दबक्या आवाजात परिसरात सुरू आहे, याआधी असे कधीही झाले नाही. धरणात पाणीच शिल्लक नसल्याने उर्वरित पाण्यातूनच पर्यटक रपेट मारण्यासाठी बोटिंग करतात, त्यामुळे पाणी गढूळ होऊन आत असणाºया माशांचा जीव जात असल्याचे निदर्शनास आले आहे.बोटिंग क्लबजवळ दहा ते पंधरा किलोचे मासे मृतावस्थेत धरणाच्या किनाºयांवर वाहत येत आहेत. त्याला प्रचंड दुर्गंधीयुक्त वास येत असल्याने मरून दोन-तीन दिवसांचा कालावधी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे अनेक मासे मृतावस्थेत त्या पाण्यात असण्याची शक्यता आहे. धोम पाटबंधारे खात्याच्या गलथानपणामुळे धरणावर संरक्षणासाठी कोणीही वाली नसल्याची स्थिती पाहावयास मिळत आहे.धोम धरणात गेल्या अनेक वर्षांपासून मासेमारी सुरू आहे. मात्र, आजपर्यंत कधीही याठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात मासे मृत झाले नव्हते. मासेमारी करणारे वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून मासेमारी करू लागले आहे. पाण्यात गुंगीचे औषध टाकले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. परिणामी याचा माशांवर परिणाम होत आहे. एकप्रकारचा हा विषप्रयोग असल्याने जलाशयातील हजारो मासे मृत पावले आहेत. या बाबीपासून अनभिज्ञ असलेल्या पाटबंधारे विभागाने संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा धोम परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.आमदारांनी लक्ष घालावे..धोम धरणात मृत माशांचा चाललेला दुर्दैवी प्रकार अतिशय निंदनीय आहे. पाटबंधारे खात्याला याची पुसटशी कल्पना देखील नाही. त्यामुळे चोरांचे फावले असून, लाखो माशांचा जीव टांगणीला लागला आहे. तरी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार मकरंद पाटील यांनी लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करण्यास भाग पाडावे, अशी मागणी स्थानिकांमधून जोर धरू लागली आहे.संसर्गजन्य रोगांच्या फैलावाची शक्यता..मृत मासे बाजारात विक्रीसाठी आल्यास नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.निसर्गाचा लहरीपणामुळे पर्यावरणात विविध प्रकारच्या विषाणूंचा शिरकाव होऊन ‘निपाह’सारख्या रोगांना निमंत्रण मिळत आहे.धोम धरणाच्या पाण्यावर लाखो लोकांच्या पिण्याचा व शेतीच्या पाण्याच्या योजना आहेत.गावांना मिळणारे पाणी दूषित मिळाल्यास संसर्गजन्य रोगांचा प्रादूर्भाव होऊन विविध प्रकारच्या रोगांना निमंत्रण मिळू शकते.
धोम धरणातील माशांवर विषप्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 23:20 IST