जगदीश कोष्टीसातारा : काश्मीरला ‘पृथ्वीवरचा स्वर्ग’ म्हटले जाते. देश-विदेशातून हौसी पर्यटक येथे दरवर्षी जातात. यामध्ये सातारकरांची संख्याही मोठी आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यभरातील असंख्य पर्यटकांनी काश्मीरची सहल रद्द केली आहे. त्यामुळे पर्यटन कंपन्या ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर, तापोळ्याला जाण्याचा त्यांना सल्ला देत आहेत. यामुळे मिनी काश्मीरमधील पर्यटकांची ओघ वाढत आहे.जम्मू-काश्मीर गेल्या काही वर्षांपासून भारतातील जागतिक कीर्तीचे पर्यटन केंद्र बनले होते. उन्हाळ्यात लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देतात. त्यावर तेथील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे तेथील तरुण पर्यटकांना देवापेक्षाही वरचे स्थान देतात; पण याच नात्याला कोणाची तरी दृष्ट लागली आणि मंगळवार, दि. २२ रोजी दहशतवाद्यांनी हेरून गोळ्या झाडल्या. यामध्ये २८ जणांचा बळी गेला होता. जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक आता कोठे स्वगृही परतू लागले आहेत. त्यांच्याकडून त्यावेळच्या परिस्थितीची आपबिती ऐकूनच येथील नागरिकांची बोबडी वळत आहे. यामुळे अनेक जण नियोजित काश्मीर ट्रीप रद्द करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.
उन्हाळा हंगाम सुरूमहाबळेश्वरमध्ये दरवर्षी १५ एप्रिलपासूनच उन्हाळा हंगाम सुरू होतो; पण यंदा राज्य शासनाच्या निर्णयामुळे अनेक शाळांना आता सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे १ तारखेपासून खऱ्या अर्थाने हंगाम सुरू होऊ शकतो.
हॉटेल व्यावसायिक सज्जयेणाऱ्या पर्यटकांना चांगली सेवा देण्यासाठी येथील हॉटेल व्यावसायिक सज्ज झाले आहेत. त्यांनी पर्यटकांसाठी विविध योजना लागू केली आहे. याबाबत संकेतस्थळावरून माहिती दिली जाते. त्यामुळे बहुसंख्य पर्यटक येथे येण्यापूर्वीच खाणे, पिणे, राहण्याची सोय करून येत असतात.
तीन दिवस महाबळेश्वर महोत्सवमहाबळेश्वर येथे प्रथमच ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ मोठ्या स्वरूपात साजरा होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हा पर्यटन महोत्सव २ ते ४ मे या कालावधीत होणार आहे. यामुळे पर्यटनवाढीसाठी चालना मिळणार आहे.
येथे आल्यावर हे पाहता येणार
- किल्ले प्रतापगड
- महाबळेश्वरमधील २५ हून अधिक निसर्गरम्य ठिकाणे
- पाचगणी टेबल लॅण्ड
- तापोळा जलपर्यटन
- वाईतील महागणपती
- मेणवली
- धोम धरणात नौकाविहार
कमवा, पण ओरबडून खाऊ नकामहाबळेश्वरमध्ये हंगामात हॉटेल व्यवसाय खूपच तेजीत असतो. अनेकदा दुप्पट-तिप्पट दर आकारले जातात. हा दर प्रत्येक पर्यटकांना परवडतोच असा नाही. त्यामुळे अनेक पर्यटक वाईमध्ये येऊन मुक्काम करतात. त्यामुळे हॉटेलचालकांनो हॉटेल व्यवसाय करा; पण ओरबाडून खाऊ नका, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
पहलगाम येथील घटनेनंतर जम्मू-काश्मीरकडे जाणाऱ्या काही सहली रद्द झाल्या आहेत. सध्या पर्यटकांचा हिमाचल, महाबळेश्वर तसेच गोव्याकडे जाण्याचा कल वाढू लागला आहे. येत्या काही दिवसांत ही पर्यटनस्थळे आणखीन गजबजून जाणार आहेत. - नीलम गायकवाड, टूर ऑर्गनायझर