पाचगणी या पर्यटनस्थळी मुख्य आकर्षण म्हणजे येथील विस्तीर्ण पठार होय. हेच पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे. याला दरवर्षी लाखो पर्यटक पर्यटनाच्या निमित्ताने भेटी देतात. त्यामुळे टेबललँड या पठारावरील व्यावसायिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. येणारा पर्यटक टेबललँडवर घोडे सफारी केल्याशिवाय राहत नाही. तसेच सहकुटुंब घोडागाडीत बसून सफर करतात. त्याचबरोबर फोटो शूटिंग करून येथील निसर्गसौंदर्याचा आनंद उपभोगतात. टेबललँडवर असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर येथे मिळणाऱ्या विविध निसर्ग मेव्याचा मनमुराद आनंद लुटतात. त्याचबरोबर येथील पारसी पॉइंट व सिडने पॉइंटसुद्धा आकर्षक आहेत. येथून धोम धरणाचे विलोभनीय दृश्य पर्यटक नजरेत भरतात.
कोरोनामुळे नऊ महिने बंद असलेली पाचगणी पर्यटन नगरी दीपावलीनंतर पर्यटनास खुली झाली असून, आता पर्यटकांचा ओघ या गिरीनगरीकडे वाढला आहे. त्यामुळे बाजारपेठेला ही ऊर्जितावस्था प्राप्त होत आहे. त्याचबरोबर या शैक्षणिक केंद्रातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा शासनाने २३ नोव्हेंबरपासून सुरू केल्या आहेत. त्यानंतर २७ जानेवारीपासून माध्यमिक शाळा सुरू होत आहेत. येथील निवासी शाळेतील मुले लवकरच दाखल होणार असल्याने शाळा सुरू झाल्याने बाजारपेठेतसुद्धा रेलचेल वाढणार आहे. कारण येथील बाजारपेठ मुख्यतः येथील पर्यटनावर आणि शाळा, हॉटेल्स यावर अवलंबून आहे. पर्यटन चालू झाल्याने बाजारपेठ सुरळीत होणार आहे.
पर्यटकांना आकर्षित करणारे व पर्यटकांच्या आवडीचे लालबुंद तांबड्या मातीतील गोड मुलायम फळ स्ट्रॉबेरीसुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध झाले आहे. येथील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देणारे फळ पर्यटकांना भुरळ घालते. त्याचबरोबर या परिसरातील इतर रानमेवाही बाजारात याच दिवसात येण्यास सुरुवात होते. यामध्ये राजबेरी, गुजबेरी, अंबुळकी बरोबर मे महिन्यात डोंगरची काळी मैना, जांभूळ अशी कितीतरी रानातील विविध प्रकारचे फळे पर्यटकांच्या दिमातीस येत असतात. यावरच येथील शेतकऱ्यांचे लोकजीवन अवलंबून असते. येथील शेतकरी व्यावसायिक महाबळेश्वर ते पाचगणी दरम्यान स्ट्रॉबेरी क्रोडीडोअर असलेल्या मुख्य रस्त्याच्या बाजूने आपल्या स्टॉल लावून आपल्या मालाची विक्री करीत असतात.
येथील बाजारपेठ तर येथे गिरीनगरीत येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टने सजलेली असते. पर्यटकांच्या आवडीच्या वस्तू या बाजारपेठेत व्यावसायिक ठेवतात. खास करून पाचगणीची ओळख असणाऱ्या याच ठिकाणी तयार केल्या जाणाऱ्या कलाकुसरीच्या वस्तू पर्यटकांना आकर्षित करतात. त्याचबरोबर महाराष्ट्रीयन खाद्य आवडीने खातात. त्याचबरोबर येथील चणे फुटाणे, जाम जेली, सरबत, पर्यटकांना मोहित करतात. हेच या लालमातीचे वैशिष्ट्य आहे. येथील शेतांच्या बांधावर जाऊन स्ट्रॉबेरीची चव चाखणे म्हणजे काही वेगळीच मज्जा पर्यटक अनुभवतात. येथील गुलाबी थंडी पर्यटकांना नेहमीच खुणावत असते. त्या करिता पर्यटक पर्यटन नगरी पाचगणीला प्रथम प्राधान्य देत आहेत.
चौकट:
पाचगणीचे सौंदर्य सिनेजगतातील लोकांना भुरळ...
कोरोना संसर्गात थबकलेली पर्यटन नगरीकडे पुन्हा पर्यटक आकर्षित होत आहेत. निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पाचगणीचे सौंदर्य नेहमीच चित्रपटांच्या माध्यमातून सिनेजगतातील लोकांना भुरळ घालीत असते. त्यामुळे या दिवसात या ठिकाणी टीव्ही मालिका, चित्रपट शूटिंग होतात. त्यामुळे येथील अनेक स्थानिकांना त्या निमित्ताने रोजगार प्राप्त होतो. तसेच पर्यटकांचासुद्धा ओघ वाढतो.
कोट..
कोरोनामुळे ही पर्यटन नगरी गेली नऊ महिने स्थब्ध झाली होती. आता हळूहळू संसर्ग कमी होत आहे. त्याच कोरोना व्हॅकसिन आल्याने लोकांच्या मनांतील कोरोना भीती नाहीशी होण्यास मदत झाली आहे. तर दीपावलीपासून शासनाने पर्यटनस्थळे चालू केली आहेत. त्यामुळे पर्यटकांची पावले पर्यटननगरीकडे पडत आहेत. त्यामुळे लवकरच पुन्हा पूर्वीसारखा बहर पर्यटन नगरीस येऊन पुन्हा बाजारपेठ नव्या जोमाने पर्यटकांच्या येण्याने ऊर्जा बहरेल येथील व्यावसायिकांचे व्यवसाय स्थिरस्थावर होतील. हे नक्की येथे येणारा पर्यटक आमचा देव आहे. अतिथी देवो भव.
- जयवंत भिलारे, भिलारे हॉलिडेज व्यावसायिक, पाचगणी