सातारा : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लोणंदमध्ये गुरुवार, दि. १६ रोजी येत आहे. दोन दिवसांच्या निमित्ताने येत असलेल्या वारकऱ्यांचे स्वागत करण्यासाठी लोणंदनगर सज्ज झाली आहे. लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये, त्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायतीने एक टन तुरटी तर दोनशे पिशव्या टीसीएल पावडर खरेदी केली आहे.वैष्णवांचा मेळा अडीच दिवसांच्या मुक्कामासाठी लोणंदनगरीत दोन दिवसांत विसावणार आहे. या काळात कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून वीज, पाणी, आरोग्य सुविधा देण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या तयारीकडे सरपंच स्नेहलता शेळके-पाटील स्वत: लक्ष ठेवून आहेत. तर जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच गणी कच्छी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी लालासाहेब निंबाळकर रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. वारकऱ्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीचे निर्जंतुकीकरण केले आहे. लोणंदमधील चार जलकुंभ बेलाचा मळा, जांभळीचा मळा, पाडेगाव पाणीपुरवठा केंद्र येथील जलकुंभ यंत्रांच्या मदतीने स्वच्छ केले आहेत. पाणीपुरवठा योजनेतील मोटर्स व्हॉल्व दुरुस्त केले असून ठिकठिकाणी उघडे पडलेले पाण्याचे व्हॉल्व्ह, बंदिस्त चेंबर बांधले आहेत. आरोग्य विभागातर्फे लोणंद गावठाण अंतर्गत असलेली सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहे दुरुस्ती केली आहेत. अकरा फिरत्या स्वच्छतागृहांच्या वाहनांची दुरूस्ती केली आहे. गावातील गवत काढले असून मुक्काम काळात डीटीटी पावडर टाकण्यात येणार आहे. (वार्ताहर)अखंड पाणीपालखी सोहळा लोणंदनगरीत आल्यापासून तरडगावला जाईपर्यंत अखंड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी सज्ज असून त्यांना ओळखपत्र देण्यात आले आहेत. तसेच पालखीतळावर दर्शनासाठी बॅरेकेट केले आहेत,’ अशी माहिती सरपंच स्नेहलता शेळके-पाटील यांनी दिली.
शुद्ध पाण्यासाठी एक टन तुरटी
By admin | Updated: July 15, 2015 00:22 IST