नागठाणे : काशीळ येथील मिठाईच्या दुकानात सोमवारी मध्यरात्री झालेल्या चोरी प्रकरणात तीन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल दिनकर माने (वय २१, रा. काशीळ, ता. सातारा) यांचे काशीळ येथील बसस्थानकासमोर मिठाईचे दुकान आहे. तिथेच शेजारी त्यांच्या चुलत बंधूंचे पान शॉप असून, रात्रीच्या वेळी पान शॉपमध्ये ते झोपण्यासाठी जातात. सोमवार, दि. १८ जानेवारी रोजी रात्री तीन वाजता स्वप्निल यांचे चुलत बंधू यांनी त्यांचे मिठाई दुकानाचे शटर उघडे असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना मोबाईलवरून संपर्क साधून कल्पना दिली. त्यावेळी स्वप्निल माने हे बंधू दीपक माने यांच्यासोबत दुकानाजवळ आले असता दुकानाचे शटर उघडलेले दिसले. आतमध्ये साहित्यासहित रोख रकमेची पाहणी केली असता चोरट्यांनी सुमारे १९ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम चोरी केल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, काशीळ बसस्थानक परिसरात आजूबाजूला पाहणी केली असता तेथीलच मनाली बीअर बारमधून तीन व्यक्ती बाहेर येताना दिसल्या. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला तर तिघे दुचाकीवरून पळून गेले. त्यावरून त्यांनी मनाली बीअर बारचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजले. याबाबतची फिर्याद स्वप्निल माने यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.