कऱ्हाड : पाचशे, हजारांच्या जुन्या नोटा चलनातून हद्दपार झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या तोंडचं पाणी पळालंय. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पुरेसा पैसा तरी हाती असावा म्हणून जो-तो जुन्या नोटा घेऊन बँकेच्या दारात रांग लावतोय. रविवारी सुटीदिवशीही बँक सुरू असल्याने नोटा बदलण्यासाठी ग्राहकांची भलीमोठी रांग लागली होती. या रांगेत आजी, मुलासह नातूही ताटकळत होते. एकाचवेळी तीन पिढ्या बँकेच्या दारात उभे असण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी. पाकिटात करकरीत नोटा घेऊन खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या कऱ्हाडकरांना सध्या सुट्या पैशांसाठी हाल सोसावे लागत आहेत. बुधवारी व गुरुवारी बँका बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. त्यातच एटीएमही बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे हाती असलेल्या पैशांवरच नागरिकांना दोन दिवस ढकलावे लागले. त्यानंतर शुक्रवारी बँक सुरू होताच नागरिकांनी जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये गर्दी केली. एकाचवेळी मोठी गर्दी झाल्याने व बँकांमध्येही नवीन चलनी नोटा तसेच शंभर, पन्नासच्या नोटांचा तुटवडा जाणवल्याने दुपारनंतर नोटा बदलून देणे बंद करण्यात आले. आठवड्यातील दुसरा शनिवार असतानाही या शनिवारी बँका सुरू राहिल्या. त्यादिवशीही मोठी गर्दी झाली. काहींनी पैसे बदलून घेतले. तर काहींनी आपल्या खात्यात पैशाचा भरणा केला. रविवारीही दिवसभर बँकांचे काम सुरू होते. त्यामुळे जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी सर्वसामान्यांसह नोकरदारही बँकेत धावले. दिवसभर बँकेच्या बाहेर मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. तरुणाई मात्र वेळ वाचविण्यासाठी लांब लांबचे कमी गर्दी असलेल्या एटीएम केंद्र शोधून काढत आहेत. (प्रतिनिधी)पेट्रोल पंपांवर बाचाबाची रोजचीचपाचशे, हजारांच्या नोटा चलनातून कायमस्वरूपी बंद होणार असून, सध्यातरी त्या नोटा पेट्रोल पंपांवर चालणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारक पंपावर जात आहेत. प्रत्येकजण एक-दोन लिटर पेट्रोलसाठी पाचशे, हजारांच्या नोटा देत आहेत. मात्र, त्याठिकाणीही या नोटा स्वीकारल्या जात नाहीत. पैसे सुटे नसतील तर पाचशे किंवा हजार रुपयांचे पेट्रोल, डिझेल भरा, असे पंपावरील कर्मचारी सांगत आहेत. त्यामुळे वाहनधारक व कर्मचाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडत आहेत. बाळा... एवढी एक नोट सुट्टी दे !पाचशे, हजारांच्या नोटा बंद झाल्याची बातमी गल्लोगल्ली धडकताच सर्वांची झोपच उडाली. या धावपळीतून आजीबाईही सुटल्या नाहीत. आगाशिवनगर येथील एक आजींनी शेजारच्या दुकानदारास हाक मारून बाळा.. मला उद्या गावाला जायचे आहे. माझ्याकडे एवढी एकच पाचशेची नोट आहे. सुटे पैसे देतोस का? असा प्रश्न करताच त्या दुकानदाराने स्वत: जवळच्या शंभरच्या पाच नोटा आजीबार्इंना दिल्या.गृहिणींचा ‘छुपा बॅलन्स’ उघडपाचशे, हजारांच्या नोटा चलनातून बंद ही बातमी घरातील चुलीपर्यंत पोहोचली. तशा प्रत्येक घरातील गृहिणी जाग्या झाल्या. संसारासाठी कळत-नकळत चार पैशाची साठवणूक करणे ही सर्वसामान्य बाब आहे. संसारात ऐनवेळी उपयोगी येईलम्हणून साठवलेला गृहिणींचा छुपा पैसा आता आपोआप बाहेर पडत आहे. ‘अहो... माझ्याकडे चार नोटा आहेत, त्याचं काय करायचे ते बघा,’ अशी वाक्य घरोघरी ऐकायला मिळत आहेत. शेतात सुगीची कामे सुरू आहेत. मजूर मिळत नाहीत. अशा परिस्थितीत आम्हाला बँकेत रांग लावून उभे राहावे लागत आहे. मी शनिवारी दिवसभर दोन नोटा बदलण्यासाठी बँकेत थांबलो होतो. आजही माझा दिवस बँकेत जाणार आहे. त्यामुळे शेतातील कामाचा खोळंबा झाला आहे. - अधिकराव भिसे, तारूख
एकाचवेळी तीन पिढ्या बँकेच्या दारात!
By admin | Updated: November 15, 2016 00:37 IST