अमर शैला
मुंबई : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाच्या शेजारीच कोयना बॅकवॉटरला लागून ११५३ चौरस किमी क्षेत्रफळावर नवीन महाबळेश्वर गिरिस्थान उभारले जात आहे. या प्रकल्पात तीन ठिकाणी छोटी व्यावसायिक विमाने उतरविण्यासाठी धावपट्ट्या उभारल्या जाणार आहेत. त्यामध्ये बाजे, उरमोडी आणि तापोळा परिसराचा समावेश आहे. यातील उरमोडी आणि तापोळा या दोन ठिकाणी धरणांतील पाण्यावर सी प्लेन उतरविण्यासाठी धावपट्ट्यांची उभारणी केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अधिकाऱ्यांनी दिली.‘एमएसआरडीसी’ने नुकताच नवीन महाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पाचा प्रारूप विकास आराखडा नागरिकांच्या सूचना, हरकतींसाठी जाहीर केला आहे. त्यामध्ये या नवीन गिरिस्थानात विमानतळे उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. ‘एमएसआरडीसी’कडून पाटण तालुक्यातील बाजे येथे जमिनीचा पृष्ठभाग समतल आहे. त्यामुळे या भागात ०.४५ किमी ते २ किमी अंतराचे छोटे विमानतळ उभारण्याचा प्रयत्न आहे. तसेच उरमोडी येथे दोन किमी लांबीची पाण्यावरील धावपट्टी साकारली जाणार आहे. तसेच ५०० मीटरचा पाण्याचा भाग हा विमाने वळविण्यासाठी ठेवला जाणार आहे. तसेच तापोळा येथेही अशा प्रकारे सी प्लेन उतरविण्याची सुविधा उभारण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.दरम्यान, बाजे विमानतळामुळे वाल्मिकी पठार, कोयना धरण, हेळवाक या परिसरात सहजरीत्या पोहोचता येईल. उरमोडी सी प्लेन प्रकल्पामुळे बामणोली, ठोसेघर, कास पठार आदी भागांत पर्यटकांना सहजरीत्या पोहोचता येईल. या माध्यमातून मोठ्या शहरातील पर्यटकांना एक-दोन दिवसांचे पर्यटन करण्यासाठी सहजरीत्या खासगी विमानांनी नवीन महाबळेश्वर गिरिस्थानात पोहोचता येईल. ‘इको टुरिझम’लाही चालना मिळेल.
नवीन महाबळेश्वरच्या उभारणीसाठी १३ हजार कोटींचा खर्चनवीन महाबळेश्वर प्रकल्पात टुरिस्ट पॅराडाईज, पर्यटन आणि निसर्ग संपदा विकास केंद्रांचा विकास साधून पर्यटनाला चालना दिली जाणार आहे. त्यासाठी पायाभूत सुविधांचे जाळे विणले जाणार आहे. यामध्ये छोटी विमानतळे, सायकल ट्रॅक, रोपवे, फर्निक्युलर रेल्वे आदींचा समावेश आहे. यासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी, तसेच विविध सोयीसुविधांचा विकास साधण्यासाठी तब्बल १२,८०९ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. दरम्यान, घाटमाथा रेल्वे उभारण्यासाठी याव्यतिरिक्त खर्च येईल.
खगोलप्रेमींसाठी डार्क स्काय पार्क, अँस्ट्रो व्हिलेजमुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये आणि आता गावांमध्येही प्रकाश प्रदूषणामुळे आकाशातील तारे स्पष्टपणे दिसत नाहीत. त्यामुळे पाटण तालुक्यातील अरळ आणि काठी या भागात डार्क स्काय पार्क आणि अँस्ट्रो व्हिलेज उभारले जाणार आहे. या ठिकाणी खगोलप्रेमींना टेंट उभारून त्यात आकाश न्याहाळता येणार आहे.