मलकापूर : शहरातील कोयना वसाहत, आगाशिवनगर, शास्त्रीनगर भागातील अतिसाराची साथ आटोक्यात आल्याचा दावा नगरपंचायतीच्या वतीने केला जात आहे. मात्र, रविवारी हा दावा फोल ठरला. रविवारी दुपारी अतिसाराच्या रुग्णसंख्येत आणखी वाढ झाली. हा संख्या हजारापर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त होत असून, या साथीचे नगरपंचायत प्रशासनाला गांभीर्यच नसल्याची परिस्थिती आहे.मलकापूर शहरात गेल्या तीन दिवसांपासून अतिसाराच्या साथीने थैमान घातले आहे. शास्त्रीनगर, कोयना वसाहत व आगाशिवनगरमधील शेकडो जणांना या साथीची लागण झाली आहे. पाण्यात क्लोरीनचे प्रमाण जास्त झाल्याने ही साथ पसरल्याचे नगरपंचायत प्रशासनाचे म्हणणे आहे. नदीला गढूळ पाणी असताना क्लोरीनची मात्रा वाढविण्यात आली होती. गढूळ पाणी बंद झाल्यानंतर ही मात्रा कमी करणे आवश्यक असताना नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे क्लोरीनची मात्रा आहे तेवढीच राहिली. परिणामी, नागरिकांना या साथीचा सामना करावा लागत आहे. गुरुवारपासून शहरातील नागरिक या साथीचा सामना करीत आहेत. शनिवारी ही साथ आटोक्यात आल्याचा दावा नगरपंचायत प्रशासनाने केला होता. मात्र, हा दावा पूर्णत: फोल ठरल्याचे रविवारी दिसून आले. शनिवारपर्यंत अतिसाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सुमारे ७०० होती. रविवारी त्यामध्ये आणखी भर पडली. नगरपंचायतीच्या म्हणण्यानुसार रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत आणखी ४४ जणांना अतिसाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. या व्यतिरिक्त अन्यही रुग्ण आढळले असून, ते खासगी रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत. मलकापूर शहरातील रुग्णालयांमध्ये गर्दी झाली असल्यामुळे रुग्णांना उपचार कोठे घ्यायचे, असा प्रश्न पडला आहे. काही रुग्ण कऱ्हाडात उपचारासाठी दाखल झाले आहेत. यापूर्वीचे ५२ व रविवारी आढळून आलेले ४४ रुग्ण अद्यापही सलाइनवर आहेत. (वार्ताहर)आरोग्य कर्मचाऱ्यांची धावाधाव४मलकापूर शहरात पसरलेल्या या साथीचे नगरपंचायतीला काहीच गांभीर्य नसल्याचे रविवारी दिसून आले. रविवारी दिवसभर प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी औषध वाटप करीत गल्लोगल्ली फिरत होते. मात्र, नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाचा एकही कर्मचारी मदतीसाठी धावाधाव करताना दिसून येत नव्हता. त्यामुळे नगरपंचायतीविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अधिकाऱ्यांची पाहणी४साथ रोग जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक मिसाळ, विस्तार अधिकारी अविनाश नावडकर, उद्धव निकम, काले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी राजेंद्र यादव यांच्यासह अधिकाऱ्यांनी रविवारी शहरातील पाणी पुरवठ्याची पाहणी केली. यावेळी सात ठिकाणचे पाणी नमुने तपासणीसाठी संकलित करण्यात आले. हे नमुने सातारला पाठविण्यात आले आहेत. मोफत औषध वाटप४शहरात पसरलेली ही साथ आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने काले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने लक्ष्मीनगर व आगाशिवनगर येथे रविवारी मोफत औषध वाटप करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र यादव, डॉ. एस. के. शिंदे, एस. व्ही. घुगे, एन. एम. अष्टोणकर उपस्थित होते. डॉक्टरसह कर्मचाऱ्यांनाही लागण४मलकापूर शहरातील रुग्णालये सध्या रुग्णांच्या गर्दीने भरले आहेत. मात्र, स्वत: डॉक्टरांनाच अतिसाराची लागण झाल्याने उपचार करणार कोण? अशी स्थिती निर्माण झाली आहे. नगरपंचायतीच्या काही कर्मचाऱ्यांनाही या साथीची लागण झाली असून, ते रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
अतिसाराच्या रुग्णांचा आकडा हजारवर !
By admin | Updated: July 19, 2015 23:36 IST