सातारा : पोलिसांनी कोणत्याही गुन्ह्यात व्यवस्थित तपास करून जर दोषारोपपत्र दाखल केले तर नक्कीच आरोपीला शिक्षा होते; पण अनेकदा तपास व्यवस्थित करूनही साक्षीदार फितूर होत असल्याने खटल्यांमध्ये आरोपींच्या निर्दोष मुक्ततेचे प्रमाण वाढत आहे. वर्षेभरात तब्बल ३८ खटल्यांमध्ये आरोपींना शिक्षा लागली, तर २१ खटल्यांमधील आरोपी निर्दोष सुटले.
एकापाठोपाठ एक गुन्हे पोलिसांकडे तपासासाठी येत असतात. अशावेळी मग तपासात कुचराई झाली की दोषारोपत्रही कमकुवत होते. परिणामी तपासातील अनेक त्रुटी आरोपीच्या पथ्यावर पडत असतात. त्यातच अलीकडे साक्षीदार फितूर होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केवळ परिस्थितीजन्य पुरावाच आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचू शकतो. हे अनेक खटल्यातून दिसून आले. २०२१ या वर्षामध्ये ८०० खटले न्यायालयात दाखल झाले. यातील बहुतांश खटल्यांना कोराेनामुळे व्यत्यय आला. काही आरोपी पोलिसांना सापडले नाहीत तर काही आरोपी गैरहजर राहिले. त्यामुळे अशाप्रकारचे तब्बल १०८ खटले कायमचे काढून टाकण्यात आले. वर्षेभरात ८२ खटल्यांचे निकाल लागले. यातील ३८ खटल्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाली, तर २१ खटल्यांमध्ये आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. तसेच १२ खटले तडजोडीने मिटविण्यात आले. त्याचबरोबर तीन खटल्यांमध्ये आरोपीचा मृत्यू झाल्याने हे तीन खटले काढून टाकण्यात आले. हे सर्व क्रिमिनल खटले असून, यात सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेले हे खटले होते.
चाैकट : गुन्हा सिद्धचे प्रमाण वाढले
वर्षेभरात ८२ खटल्यांचा निकाल लागला. यापैकी ३८ खटल्यांमध्ये आरोपींना शिक्षा लागली तर २१ खटल्यांतील आरोपींना शिक्षा लागलीय. यावरून गुन्हा सिद्धचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे.
चाैकट : अपयशाचे खापर साक्षीदारांवर
अनेकदा तपासामध्ये त्रुटी ठेवल्यामुळे आरोपी निर्दोष सुटत असतात. मग याचे खापर साक्षीदारांवर फोडले जाते; पण पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे मिळविले तरच आरोपीला शिक्षा होते. मात्र, बऱ्याचदा असे होत नाही. परिणामी तपासातील त्रुटींचा आरोपींना फायदा झाल्याचे अनेक खटल्यांत समोर आलेय.
कोट : आरोपींना शिक्षा होण्यासाठी तपास बारकाव्याने कारावा लागतो. एक जरी चूक राहिली तरी आरोपीला त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे आम्ही दोषारोपत्र दाखल करताना कोणतीही त्रुटी राहू नये, याची खबरदारी घेतो.
सजन हंकारे, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका
चाैकट : आकडेवारी....
सत्र न्यायालयात वर्षेभरातील प्रकरणे
८००
गुन्हे सिद्ध झाले
३८
पुराव्याअभावी आरोपींची मुक्तता
२१