महाबळेश्वर : कोरमअभावी बुधवारी तहकूब केलेली महाबळेश्वर पालिकेची ॲानलाइन सर्वसाधारण सभा गुरुवारी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बुधवारप्रमाणेच गुरुवारीही विरोधी गटातील तेरा नगरसेवकांनी सभेला दांडी मारली. विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आले. दरम्यान, नगरसेवक मुख्याधिकाऱ्यांना या सभेत लक्ष्य करून त्यांचेवर टीकेची झोड उडविली.
राष्ट्रवादी व शिवसेना समर्थक नगरसेवकांनी बुधवारी आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेतील पहिल्या विषयावर आक्षेप घेतला होता. परंतु सत्ताधारी गटाने या तेरा नगरसेवकांच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष केले. यामुळे तेरा नगरसेवकांनी बुधवारीच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकला. कोरम पूर्ण झाला नाही. त्यामुळे ती सभा तहकूब केली.
तहकूब केलेली सभा गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता घेण्यात येईल, असे नगराध्यक्षांनी जाहीर केले.
त्यानुसार गुरुवारी दुपारी सुरू झाली. गुरुवारीही विरोधी गटातील तेरा नगरसेवक गैरहजर राहिले. कोरमअभावी एकदा तहकूब केलेल्या सभेला पुन्हा कोरमची आवश्यकता नसते. त्यामुळे अल्प नगरसेवकांच्या उपस्थितीत सभेचे कामकाज पूर्ण केले. तेरा नगरसेवकांनी पहिल्या विषयावर आक्षेप घेतला होता. त्या विषयासह विषय आजच्या सभेत मंजूर केले. कोरमअभावी सभा रद्द होते. परंतु, नगराध्यक्षांनी सभा रद्द न करता तहकूब करून ती सभा पुन्हा आयोजित केली, अशी सभा बेकायदशीर ठरते. त्यामुळे गुरुवारच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकत नाही, असे पत्र मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी नगराध्यक्षांना दिले होते. त्यामुळे सभेला मुख्याधिकारीही अनुपस्थितीत राहिल्या.