सातारा : शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सीसीटीव्ही फुटेजवरुन अल्पवयीन चोरट्याला पकडले. त्याच्याकडून घरफोडीतील ११ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे व सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला घरफोडीतील चोरांना अटक करण्याची सूचना केली होती. त्यानुसार एका घरफोडीच्या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली. त्यामध्ये एक संशयित दिसून आला. १८ ऑगस्ट रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी सीसीटीव्ही फुटेजमधील सारखाच एकजण गडकर आळी परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने तेथे जाऊन संशयिताला ताब्यात घेतले. संबंधित अल्पवयीन होता. चौकशी केल्यावर त्याने चोरीची कबुली दिली. तसेच घरफोडीतील ११ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले.
या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, अभिजित यादव, हवालदार लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्नील कुंभार, सचिन माने, ओंकार यादव, मोहन पवार, पंकज मोहिते यांनी सहभाग घेतला.
........................................................