कोपर्डे हवेली : ‘गळीत हंगाम सुरू होताना आंदोलनाला पूरक परिस्थिती नव्हती. पाणीटंचाईने शेतकरी अडचणीत होता. त्यामुळे आम्ही आंदोलनाची चढाई केली नाही. सध्या एफआरपीनुसार शेतकऱ्यांना ८० टक्के रक्कम मिळाली आहे. २० टक्के रक्कम येणे बाकी आहे. सध्या साखरेचे दर वाढले आहेत. त्यासाठी सहकार मंत्र्यांना भेटणार असून, यातूनही साखर सम्राटांनी काहीच ऐकले नाही तर एप्रिल महिन्यात पुन्हा आंदोलन करणार आहे,’ अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली.पार्ले, ता. कऱ्हाड येथे स्वाभिमानीच्या शेतकऱ्यांचा आनंदोत्सव मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, कऱ्हाड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश नलवडे, कऱ्हाड उत्तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सचिन नलवडे, विनायक भोसले, रामभाऊ रैनाक, भरत चव्हाण, धनाजी शिंदे, साखर खोत, वसंतराव चव्हाण, देवानंद पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.खासदार शेट्टी म्हणाले, ‘काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने कारखानदारी मोडीत काढली आहे. तर सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण झाले आहे. आम्ही आमच्या तत्वापासून बाजूला नाही. सर्वांनी ही चळवळ पुढे नेली पाहिजे. गेल्या पाच वर्षांपासून बऱ्याच प्रमाणात कारखान्याकडून चोरी करण्याचे मार्ग बंद करीत आणले आहे. धन, दौलतीपेक्षा माझे कार्यकर्तेच माझी मोठी संपत्ती आहे.’सदाभाऊ खोत म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या चळवळीमुळे शेतकऱ्यांना साखरेसह उपपदार्थ मिळणाऱ्या पैशाचा हिशेब कळू लागला आहे. कारखानदार हुकूमशहा पद्धतीने वागत आहे. कारखानदारी हेच त्यांचे वतन आहे. पारंपरिक लोकच या ठिकाणी कायम बसले आहेत. साखरेच्या वाढीव दरासाठी आपणाला दुसरे आंदोलन करावे लागणार आहे. उसाबरोबर दूध धंदा तोट्यात सुरू आहे. त्यासाठी दूध शासनाने खरेदी केले पाहिजे. संघटनेच्या ताकदीमुळे आणि सहकाऱ्यांना उसाचे थकित पैसे मिळाले. त्यासाठी सर्वांनी संघटितपणे लढा उभा केला,’ असे प्रतिपादन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केले.शेवटी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी संघटनेची शपथ घेतली. सचिन नलवडे यांनी प्रास्ताविक केले. संदीप पवार यांनी आभार मानले. (वार्ताहर)
एप्रिलमध्ये आंदोलनाची ठिणगी पडेल
By admin | Updated: March 25, 2016 00:05 IST