कऱ्हाड : कऱ्हाड पालिका कारभाऱ्यांचा कार्यकाल आता फक्त चार महिने उरला आहे. गेली साडेचार वर्षे ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ करत कारभार करणाऱ्यांना आता मात्र कोणातच काही चांगले दिसेना झालेय. सुमारे चार-पाच महिने रखडलेला पालिकेचा अर्थसंकल्प नुकताच मंजूर झालाय; पण त्यावरूनही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. या आरोप-प्रत्यारोपांत एकमेकांना चोर ठरविण्याची जणू स्पर्धाच लागलेली दिसते; पण नागरिकांमध्ये मात्र पालिकेचा सध्याचा कारभार म्हणजे ‘चोर मचाये शोर’ असाच सुरू असल्याची चर्चा आहे.
पालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजपच्या उमेदवार असलेल्या रोहिणी शिंदे यांना लोकनियुक्त नगराध्यक्ष होण्याची संधी मिळाली; पण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या जनशक्ती आघाडीला बहुमत मिळाले. तर सध्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडीला विरोधी बाकावर बसण्याचा कौल मिळाला. त्यामुळे ‘सत्तेचे त्रांगडं’ हे नाटक गेल्या साडेचार वर्षांत कऱ्हाडकरांना पाहायला मिळालेले आहे.
‘नगराध्यक्षपद गाठीशी; पण बहुमत नाही पाठीशी’ अशा परिस्थितीमुळे रोहिणी शिंदे यांना बरीच सर्कस करावी लागली. पण या काळात त्यांचे ‘रिंगमास्टर’ बरेच बदललेले दिसले. त्यामुळे त्यांच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित करण्याची विरोधकांना आयती संधी मिळाली. ती संधी सोडतील ते विरोधक कसले? गत साडेचार वर्षांत पालिका कारभारात बरेच ‘रामायण’ घडल्याचे कऱ्हाडकरांना माहीत आहे. पण अंतिम टप्प्यात ‘महाभारत’ सुरू झालेले दिसते. प्रत्येकजण आरोप-प्रत्यारोप करत एकमेकांची जणू लक्तरे बाहेर काढताना दिसत आहेत. त्यामुळे एका बाजूला कऱ्हाडकरांची करमणूक होत असली तरी सुज्ञ कऱ्हाडकरांच्या ते किती पचनी पडणार, ते सुद्धा महत्त्वाचे आहे.
सुमारे पाच महिन्यांपूर्वी कऱ्हाडच्या अर्थसंकल्पाची सभा झाली. या सभेत मुळात तो अर्थसंकल्प वाचायचा कोणी यावरून ‘तू-तू मै-मै’ सुरू झाली. भाजपच्या नगरसेवकांनी १३४ कोटींचा अर्थसंकल्प वाचला. त्याला बहुमत असणाऱ्या जनशक्ती आघाडीने आक्षेप घेतला. राजेंद्र यादव यांनी उपसूचना करत २७० कोटींचा अर्थसंकल्प मांडला. सूचना की उपसूचना मंजूर यावरूनही गदारोळ झाला. दोन स्वतंत्र अर्थसंकल्प मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन पडले. मंजुरीसाठी जनशक्तीने उपोषणाचे पाऊल उचलले; पण शासनाने त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या चालीने रमत गमतच हा अर्थसंकल्प मंजूर केला आहे. आता या मंजुरीनंतर ‘नैतिक विजयाचा’ मुद्दा ऐरणीवर आला आहे.
त्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांना बरोबर घेत पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी राजकीय वजन वाढविण्यासाठी उपोषणाचा स्टंट केल्याचा आरोप राजेंद्र यादवांवर केला. तसेच लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनाही चिमटे काढले. त्याला प्रत्युत्तर म्हणून लोकशाही आघाडीने पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्षांनी पदाचा गैरवापर करून पालिकेत मानधन व भत्ते कोरोनासाठी जमा करण्याचा ठराव झाला असतानाही मानधन घेतल्याचा आरोप केला आहे. त्यासाठी पालिकेतील ठरावाची प्रतही माध्यमांना दिली आहे.
भरीस भर म्हणून जनशक्ती आघाडीने पत्रकार परिषद घेत राजेंद्र यादव यांनी नगराध्यक्षांचा अहंकार शहराच्या विकासात आड येत असल्याचा आरोप केला. याचवेळी महिला बालकल्याण समितीच्या सभापती स्मिता हुलवान यांनी लोकशाही आघाडीने केलेल्या मानधनाच्या आरोपाची री ओढत नगराध्यक्ष शिंदे यांनी मानधनाची चोरी केल्याचा घणाघात घातला. त्यामुळे पालिकेतील राजकीय वातावरण भलतेच गरम झाले आहे. या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अशाच सुरू राहणार की थांबणार ते सांगता येत नाही. पण हे सगळे आरोप-प्रत्यारोप पाहता पालिकेत सध्या ‘चोर मचाये शोर’ अशी स्थिती असल्याची चर्चा शहरभर आहे.
चौकट
म्हणे उपनगराध्यक्ष चतुर..
पालिकेच्या कारभारावरून सत्ताधारी विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप झडत असताना विद्यमान उपाध्यक्ष जयवंत पाटील हे मात्र कोठे दिसत नाहीत. त्यामुळे उपनगराध्यक्ष पाटील यांची ही राजकीय चतुराई असल्याचे म्हटले जात आहे.
(चौकट)
कोणाकोणाचे पाय गाळात
पुराचे पाणी प्रीतीसंगम बागेत बऱ्याचदा शिरते. त्यानंतर पालिकेचे कारभारी त्याच्या स्वच्छतेसाठी सरसावल्याचे पाहायला मिळते. स्वच्छता करताना एकदा झालेली चिखलफेक कऱ्हाडकरांना ज्ञात आहेच. तर अलीकडच्या काळात बागेतील गाळ काढण्यासाठी कारभारी सक्रिय झाल्याचे दिसले; पण भ्रष्टाचाराच्या गाळात कोणाकोणाचे पाय आहेत, याची चर्चा शहरात सुरू आहे.
(कऱ्हाड पालिका फोटो वापरावा)