हणमंत पाटीलसातारा : फलटण शहराला ऐतिहासिक, सांस्कृतिक व महानुभव पंथाची परंपरा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत राजकारणात गुन्हेगारीचा शिरकाव झाला. अवैध धंदे व व्यवसायांना बळ आणि राजाश्रय मिळाला. त्यानंतर प्रशासकीय राजवटीत पोलिस यंत्रणेला हाताशी धरून कोणता गुन्हा दाखल करायचा, कोणती कलमे लावयची, हे ठरविणारी नवी यंत्रणा (आका) स्थानिक नेत्यांच्या आशीर्वादाने कार्यरत झाली. ही यंत्रणा फलटण शहरातील कोणत्या ‘आका’च्या इशाऱ्यावर चालते, याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे, असे फलटणकरांचे म्हणणे आहे.पीडिता डॉक्टर आत्महत्येनंतर ऐतिहासिक फलटण शहराची देशभर बदनामी झाली. संबंधित डॉक्टरने प्रशासकीय यंत्रणेकडे आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी पत्रव्यवहार केला. त्यानंतरही फलटणमधील स्थानिक नेत्यांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या व नाचणाऱ्या प्रशासकीय व पोलिस यंत्रणेने त्याची योग्य वेळी दखल घेतली नाही.त्यामुळे हतबल झालेल्या पीडिता डॉक्टरला आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला, असे प्राथमिक तपासातून दिसून येते. शिवाय उपजिल्हा रुग्णालयातील वरिष्ठांनीही योग्य वेळी संबंधित डॉक्टरची बदली केली असती, तरीही ही दुर्घटना टाळता आली असती, असे फलटणमधील सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.
अवैध व्यवसायांना राजाश्रयगेल्या काही वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर स्थानिक लोकप्रतिनिधींचा अंकुश आला. याच काळात फलटण शहरात अवैध दारू अड्डे, मटका, चक्री व गुटखा विक्री फोफावली. माझा कार्यकर्ता आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल करू नका. हा विरोधी कार्यकर्ता आहे, त्याच्यावर जादा कलमे टाका, असा पोलिस यंत्रणेत राजकीय हस्तक्षेप वाढला. आपलेच कार्यकर्ते गुन्हेगारी व अवैध धंदे चालवत असल्याने त्यांना राजाश्रय मिळत गेला.
फलटणमध्ये बदली ‘नको रे बाबा’एकेकाळी फलटण शहरात बदली मिळण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून ‘लॉबिंग’ केले जायचे. गेल्या काही वर्षांत शहरातील राजकारणाची पातळी घसरल्याने आणि राजकीय गुन्हेगारीकरण वाढले. नेत्यांच्या राजाश्रयाने नवीन ‘आका’ तयार होऊ लागले. त्यामुळे पूर्वी पोस्टिंग असलेल्या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या तक्रारी व निलंबनाच्या कारवाई झालेले अधिकारी वगळता चांगले अधिकारी ‘फलटणमध्ये बदली नको रे बाबा’, असे म्हणू लागले आहेत.
‘आका’च्या निर्मितीचे स्रोत...
- ‘राजाश्रया’ने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना बळ मिळाले.
- अवैध धंद्यांना राजकीय संरक्षण मिळाल्याने आर्थिक पत वाढली.
- आपण काही केले, तरी आपला नेता सोबत आहे, हा आत्मविश्वास वाढला.
- गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कार्यकर्त्यांना रस्ता, बांधकामांची ठेकेदारी मिळाली.
मुकादम, ठेकेदारांच्या वसुलीचे केंद्रगेल्या काही वर्षांत येथील साखर कारखानादारीसाठी येणारे मजूर, मुकादम व ठेकेदारांची वसुली करण्यासाठी पोलिस स्टेशन हे केंद्र बनविण्यात आले. कोणाला उचलायचं, ताब्यात घ्यायचं आणि कोणाला सोडायचं, हे नेत्यांचे तथाकथित ‘आका’ ठरवू लागले. मात्र, नेते त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून नामानिराळे झाल्याचे चित्र निर्माण झाले.
फलटणला ऐतिहासिक व आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत घडलेल्या दुर्दैवी घटनांमुळे व ऐतिहासिक वारसा कलंकित करण्याचे काम राजकीय मंडळी करीत आहेत. त्यामुळे फलटण तालुका बदनाम होत आहे. राजकीय नेत्यांनी स्वार्थासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीचे व पार्श्वभूमीच्या कार्यकर्त्यांचे पालन पोषण केले. त्यामुळे आजच्या फलटणच्या विदारक परिस्थितीचे खरे सूत्रधार राजकीय नेते आहेत. मात्र, कागदोपत्री ते कुठेच सहभाग नसल्याने ते नामानिराळे राहतात. त्यांचा शोध घेऊन बंदोबस्त करायला पाहिजे. - युवराज शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, फलटण
Web Summary : Phaltan faces defamation after a doctor's suicide, highlighting alleged political interference in administration. Illegal businesses thrive with political patronage, creating a climate where criminals gain power. Good officers avoid postings in Phaltan due to increased crime.
Web Summary : एक डॉक्टर की आत्महत्या के बाद फलटण बदनामी का सामना कर रहा है, जिससे प्रशासन में कथित राजनीतिक हस्तक्षेप उजागर हुआ है। राजनीतिक संरक्षण से अवैध कारोबार फलफूल रहा है, जिससे अपराधियों को शक्ति मिल रही है। बढ़ते अपराध के कारण अच्छे अधिकारी फलटण में पोस्टिंग से बचते हैं।