फलटण : फलटण तहसील कार्यालयातील महत्त्वाचे दस्तावेज असलेले सर्व संगणक शनिवारी रात्री चोरीला गेले. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, या चोरीमागे कोणी तरी माहीतगार असल्याचा संशय नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.
फलटण शहरात ऐतिहासिक अशी अधिकार गृह नावाची इमारत आहे. या इमारतीमध्ये प्रांत, तहसील कार्यालय, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, सिटी सर्व्हे, सेतू, नीरा उजवा कालवा, निबंधक अशी विविध शासकीय कार्यालये आहेत. या अधिकार गृहाला तीन प्रवेशद्वार आहेत. पश्चिम बाजूचे गेट चोवीस तास खुले असते. याचा फायदा घेत शनिवारी रात्री चोरट्यांनी तहसील कार्यालयात येऊन सर्व संगणक चोरून नेले.
संगणक यंत्रणा चोरीस गेल्याने त्यामध्ये असलेली कामकाजविषयक माहिती, खटले, दाव्यातील महत्त्वाची कागदपत्रे, शासकीय आदेश अशी कोणतीच माहिती आता प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे प्रशासनाला कामकाज करणे अवघड होणार आहे. तहसील कार्यालयात रात्रीच्या पहारेकऱ्याचे पद रिक्त असून शासनाने ते पद आजवर भरले नाही. येथील चोरीमागे एखादा माहीतगारच असण्याची शक्यता वर्तविली जात असून, पोलिसांनी घटनेचा सखोल तपास करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
(चौकट)
फलटण तहसील कार्यालयातील चोरीमागे प्रभारी तहसीलदार म्हणून काम केलेल्या अधिकाऱ्याचा हात असण्याची शक्यता आहे. प्रभारी तहसीलदार असताना त्यांनी अनेक प्रकरणे आर्थिक व्यवहारातून हाताळली आहेत. ही प्रकरणे चव्हाट्यावर येऊ लागली आहेत. त्यामुळे चोरीचा घाट घातला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- अनुप शहा, नगरसेवक
(चौकट)
फलटण तहसील कार्यालयातील चोरीची घटना दुर्दैवी आहे. पोलीस प्रशासन याचा तपास करून निश्चितच चोरट्यांना शोधून काढतील. चोरीला गेलेल्या संगणकातील काही डाटा पेन ड्राइव्हमध्ये सुरक्षित आहे. तरीसुद्धा नवीन संगणक बसवून सर्व कामकाज पूर्ववत केले जाईल. तसेच सुरक्षेची योग्य काळजी घेतली जाईल.
- समीर यादव, तहसीलदार
फोटो : ३१ फलटण
फलटण तहसील कार्यालयाच्या याच इमारतीमधून शनिवारी रात्री संगणक चोरीला गेले. (छाया : नसीर शिकलगार)