कऱ्हाड : वेगवेगळ्या ठिकाणच्या बांधकाम साईटवरून गत वर्षभरात चोरलेल्या सुमारे वीस लाखांच्या सेंट्रिंग प्लेटा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून, अन्य काही संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सोमवारी ही कारवाई केली. सागर हणमंत चव्हाण (वय २७, रा. गोटे, ता. कऱ्हाड) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील भास्कर बाबूराव शिंदे, गजानन हौसिंग सोसायटीतील सागर मुळे, कोपर्डे हवेलीतील मोहन चव्हाण, पाडळी येथील नदीम मुलाणी व मुंढे येथील दीपक जमाले यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी साईट सुरू होत्या. काही इमारतींचे बांधकाम गतवर्षी झाले तर काही इमारतींचे बांधकाम सहा महिन्यांपूर्वीपर्यंत सुरू होते. बांधकामांच्या ठिकाणी या व्यावसायिकांनी स्लॅब टाकण्यासाठी सेंट्रिंगच्या प्लेटा वापरल्या होत्या. काम संपल्यानंतर त्यांनी त्या काढून तेथेच ठेवल्या. काही दिवस त्या प्लेटा त्याचठिकाणी पडून होत्या. चोरट्यांनी पाळत ठेवून त्या प्लेटा लंपास केल्या. वर्षभरात त्यांनी संबंधित पाच व्यावसायिकांच्या मालकीच्या सुमारे १ हजार ५०० लोखंडी प्लेटा चोरल्या. या प्लेटा वेळोवेळी चोरण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्या-त्या वेळी प्लेटांची संख्या कमी असल्याने व त्यांची एकूण किंमतही कमी होत असल्याने व्यावसायिकांनी याबाबतची तक्रार पोलिसांत दिली नाही. दरम्यान, गोटे येथील सागर चव्हाण हा सेंट्रिंगच्या लोखंडी प्लेटा चोरत असल्याची माहिती कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली. पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक एच. एन. काकंडकी यांच्यासह पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यांनी सागर चव्हाण याची सर्व माहिती संकलित केली. तसेच त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवले. या कालावधीत सागरने प्लेटा चोरून घरानजीकच त्याचा ढीग लावल्याचे दिसून आले. खात्री झाल्यानंतर गुन्हे शाखेने सागरला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली असता त्याने संबंधित प्लेटा चोरल्याची कबुली दिली. गुन्हे शाखेने सागर चव्हाणला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून आत्तापर्यंत सुमारे २० लाख रुपये किमतीच्या १ हजार ३४० लोखंडी प्लेटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. आणखी प्लेटा त्याच्याकडून हस्तगत होण्याची शक्यता आहे. सहायक निरीक्षक काकंडकी, सहायक फौजदार ए. पी. पवार, हवालदार पी. के. कदम, नाईक पी. बी. पवार, डी. पी. खाडे, सुधीर जाधव, राजकुमार कोळी, राजेंद्र पाटोळे, संजय काटे, वैभव डांगरे, अमोल पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. (प्रतिनिधी)मालवाहतूक रिक्षाचा वापरसेंट्रिंगच्या प्लेटा चोरण्यामध्ये आणखी दोघांचा हात असल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. पोलीस त्या दोघांचा शोध घेत असून, त्यांच्याकडून काही लोखंडी प्लेटा हस्तगत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, संशयित बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पाळत ठेवून ज्या इमारतीनजीक लोखंडी प्लेटा पडल्या आहेत, अशा इमारतीची पाहणी करायचे. रात्रीच्या वेळी मालवाहतूक रिक्षा घेऊन ते त्याठिकाणी जायचे. कोणाला काही समजण्यापूर्वीच सर्व प्लेटा रिक्षामध्ये भरून तेथून निघून जायचे, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.
चोरीच्या वीस लाखांच्या लोखंडी प्लेटा हस्तगत
By admin | Updated: December 1, 2015 00:10 IST