विकास शिंदेफलटण : फलटणच्याराजकारणात सध्या एका मोठ्या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू आहे. पितृपक्षानंतर, म्हणजेच २२ सप्टेंबरनंतर तालुक्यात एक मोठा राजकीय भूकंप घडणार असल्याची कुजबुज खासगीत ऐकायला मिळत आहे. एका बड्या नेत्याच्या पक्षांतराचा विषय सध्या चर्चेचा केंद्रबिंदू बनला असून, हा नेता नेमका कोण, तो ज्येष्ठ आहे की उमदा तरुण, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.फलटण हे राजकारणाचे केंद्रस्थान मानले जाते, जिथे घडणाऱ्या घडामोडींचा प्रभाव राज्यावरही दिसून येतो. त्यामुळे एका बड्या नेत्याच्या पक्षांतराची चर्चा सर्वांसाठीच औत्सुक्याचा विषय ठरली आहे. राजकीय नेत्यांना एखाद्या पक्षात न्याय मिळाला नाही, कामाची संधी मिळाली नाही किंवा सत्ता मिळाली नाही, तर दुसऱ्या पक्षात जाण्याचा मार्ग नेहमीच खुला असतो.फलटणच्या राजकारणातही गेल्या काही दिवसांपासून सोयीचे राजकारण आणि बदललेली समीकरणे स्पष्टपणे दिसत आहेत. अनेक वर्षे ज्यांच्यावर टीका केली, त्यांच्याशीच जुळवून घेण्याची भूमिका काही नेत्यांनी घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांसमोर तलवारी उपसून लढणाऱ्या नेत्यांनी आता जणू आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत. त्यामुळे, बदलत्या परिस्थितीत हा राजकीय भूकंप अटळ असल्याचं बोललं जात आहे.
नवा अध्याय, नवी दिशा..यापूर्वीही अनेकदा अशा राजकीय भूकंपांच्या चर्चा झाल्या. तारखाही ठरल्या, मुहूर्तही काढले; पण प्रत्येक वेळी काही ना काही अडचणींमुळे या घडामोडी पुढे ढकलल्या गेल्या. आता मात्र, वातावरण पूर्णपणे बदलले आहे. फलटणच्या विकासाची चर्चा जाणीवपूर्वक केली जात आहे आणि यामागे नव्या राजकीय रंग भरण्याचा प्रयत्न सुरू आहे. या बदललेल्या परिस्थितीत, पितृपक्षानंतर एक नवा अध्याय घेऊन येणार असल्याचं मानलं जात आहे. हा नेता ज्येष्ठ आहे की तरुण, हे मात्र २२ सप्टेंबरनंतरच स्पष्ट होईल. या राजकीय भूकंपाची चर्चा केवळ तालुक्यातच नाही, तर संपूर्ण राज्यात उत्सुकता वाढवणारी ठरली आहे.
तर बदलतील बरीच समीकरणेसध्याच्या पक्षात राजकीय ताकद मिळत नसल्याने तसेच मागण्यांची पूर्तता होत नसल्याने राजकीय भविष्याची चिंता लागून राहिलेले नेतृत्व मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत समझोत्याने जागावाटप होऊन राजकीय अस्थिरता थांबवण्याचा प्रयत्नही होऊ शकतो. पितृपक्षानंतर होणाऱ्या राजकीय घडामोडीनंतर फलटण तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलतील, अशी जोरदार चर्चा आहे.