वाठार निंबाळकर : पुणे-पंढरपूर रस्त्यावर फलटण तालुक्यातील विडणी हद्दीतील ओढ्याच्या पुलावर टेम्पो आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सकाळी झाला. अशोक महादेव राऊत (वय २४, रा. आंदरुड) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण बाजूकडून पंढरपूरकडे निघालेला मालवाहतूक करणारा टेम्पो (केए २८ ए ८६५६) रविवारी सकाळी विडणी हद्दीत आला. त्याचवेळी आंदरुडहून फलटणकडे निघालेला अशोक महादेव राऊत यांची दुचाकी त्याठिकाणी आली. यावेळी पुलावर टेम्पो व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की, अपघातानंतर चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टेम्पो रस्त्यावरील पुलाचा संरक्षक कठडा तोडून ओढ्यात जाऊन उलटला. या अपघाताची फिर्याद लक्ष्मण पिराजी राऊत यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. टेम्पोचालक वालप्पा लमाने (रा. विजापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक आर. एस. गायकवाड तपास करीत आहेत. (वार्ताहर)
टेम्पो-दुचाकीच्या धडकेत एक ठार
By admin | Updated: May 18, 2015 01:03 IST