पळशी येथील सोपान जाधव ऊर्फ बाळू यांनी हे मंदिर बांधले आहे. सोपान जाधव यांचे वडील गणपत जाधव हे मुंबईत ३८ वर्षे मिलमध्ये काम करत होते. त्यानंतर, ते गावी आल्यानंतर शेती करत होते. तर, बकुळाबाई मात्र आयुष्यभर गावीच होत्या. घरात १८ माणसांचं कुटुंब होतं. त्यांना काय हवं-नको त्याच बघत असत. दरम्यान, त्यांना किडनीचा त्रास जाणवत असल्याने २१ वेळा रुग्णालयातील अतिदक्षता विभागातून बरे करून घरी आणले होते.
या आजारपणातच ८ फेब्रुवारी २०१२ रोजी आईचे निधन झाले. हा धक्का सहन न झाल्याने वडिलांचेही २० मार्च २०१२ रोजी निधन झाले. कार्य पार पडल्यानंतर बाळू जाधव यांनी विचार केला की, किती मुलांना वर्षश्राद्धानंतर आई-वडिलांची आठवण राहते. पण, आपण हे थांबवले पाहिजे, हा विचार करून आई-वडिलांचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला अन् वडूज रस्त्यावर असलेल्या शेतात त्यांनी एक मंदिर बांधण्याचा संकल्प केला. अवघ्या वर्षभरात ते बांधून तयारही झाले. मंदिरात आई-वडिलांच्या मूर्ती ठेवल्या आहेत. या मूर्ती पंढरपूरहून संगमरवरी दगडात साकारल्या आहे. या ठिकाणी दररोज पूजा-आरती, दिवाबत्ती केली जाते. बाळू जाधव यांनी मुलांवरही हेच संस्कार केले आहेत.
चौकट
बारा गुंठे जागेत मंदिर
स्वत:च्याच शेतात १० ते १२ गुंठे जागेत हे मंदिर बांधले असून गाभारा ११ बाय ११ फुटांचा आहे. उरलेल्या जागेत बाग बनवली आहे. विविध जातींची फुलझाडे लावली आहेत.
चौकट :
सैनिकांचा गौरव
दरवर्षी वर्षश्राद्धाला विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये भजन, कीर्तन तसेच गावातील आजी-माजी सैनिकांचा टॉवेल-टोपी देऊन सत्कार केला जातो, अशी माहिती सोपान जाधव यांनी दिली.
उंची :
५५ फूट
गाभारा
११ चौरस फूट
- जगदीश कोष