सातारा : आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ ४६ दिवस उरल्याने पालिकेने करवसूली मोहीम अधिक गतिमान केली आहे. शहरातील थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आली असून, पालिकेने फिरत्या वसुली पथकाची नेमणूकही केली आहे. जे थकबदारीदार कर भरणा करणार नाहीत, अशांचे नळकनेक्शन तोडण्याच्या तयारीत पालिका प्रशासन आहे.
पालिकेच्या हद्दीत तब्बल ३६ हजार मिळकती आहेत. निवासी मिळकतींची तीन रुपये, तर व्यावसायिक मिळकतींची सहा रुपये स्क्वेअर फूटप्रमाणे कर आकारणी केली जाते. जवळपास सर्वच थकबाकीदारांना पालिकेकडून कर भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. कारवाई टाळण्यासाठी अनेकांनी पालिकेत येऊन कर भरणा केला. मात्र, अजूनही बड्या धेंड्यांनी कर जमा करण्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे पालिकेच्या वसुली विभागाने कर वसुली मोहीम अधिक गतिमान केली असून, याकामी फिरथे पथकही नेमले आहे.
पालिकेला कर रूपात तब्बल ४४ कोटी २९ लाख ५११ रुपये वसूल करावयाचे आहेत. यापैकी आतापर्यंत सुमारे दहा कोटींचा महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. उर्वरित ३४ कोटींपैकी तब्बल १६ कोटी ही केवळ दंडाचीच रक्कम आहे. त्यामुळे पालिकेला आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी १८ कोटींचे उद्दिष्ट गाठावयाचे आहे. कर जमा करण्याकडे अनेकजण पाठ फिरवत असल्याचे पालिकेने निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा थकबाकीदारांचे पाणी कनेक्शन तोडण्याबाबत प्रशासन विचार करीत आहे. ही कारवाई टाळण्यासाठी थकबाकीची रक्कम अदा करण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय थकबाकीदारांकडे नाही.
फोटो : १२ वसुली फोटो
सातारा पालिकेच्या वसुली विभागाने करवसुलीसाठी फिरत्या पथकाची नेमणूक केली आहे.