खंडाळा : पुणे-सातारा मार्गावरील खंबाटकी घाटात तलवारीचा धाक दाखवून अज्ञात चोरट्यांनी ट्रकचालकास मारहाण केली आणि २६ हजार रुपयांची रोकड लुटून नेली. या घटनेमुळे खंबाटकी घाट परिसरात वाहनचालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी (दि. १६) रात्री साडेअकराच्या सुमारास ट्रक (एमएच ०६ ओसी ५००८) खंबाटकी घाटातून साताऱ्याकडे निघाला होता. जुना टोल नाका ओलांडल्यानंतर घाटाच्या दुसऱ्या वळणावर हा ट्रक बंद पडला. ट्रकचालक तौकीर अहमद काझी (वय ३५, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. शिवडी, मुंबई) हे गाडीतून खाली उतरले असता पाठीमागून एक मारुती व्हॅन आली आणि त्यांच्या जवळ थांबली. त्यातून चार अज्ञात इसम खाली उतरले आणि त्यांनी काझी यांच्या हातावर तलवारीने वार केले. त्यांना बेदम मारहाण करून त्यांच्याजवळील मोबाइल आणि २६ हजारांची रोख रक्कम लुटली. त्यानंतर व्हॅनमधून चोरटे पसार झाले.जखमी अवस्थेत ट्रकचालक काझी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक अशोक शेवाळे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)टोळी पुन्हा सक्रियखंबाटकी घाटात घडलेल्या या प्रकारामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांकडून भीती व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय महामार्गावर लूटमार करणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत असल्याने पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. रात्रीची पोलीस गस्त सुरू करण्याची मागणी चालकांमधून होत आहे.
तलवारीचा धाक : ट्रकचालकास मारहाण; २६ हजार ऐवज लंपास
By admin | Updated: March 18, 2015 00:07 IST